लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओमायक्राॅनमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बालकांचा बचाव व्हावा, याकरिता ३ जानेवारीपासून कोरोना कवच लाभणार असल्याची सुखद वार्ता आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील १,४९,९५६ बालकांचे १५५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे. तसे आदेश अतिरिक्त आरोग्य संचालकांनी बुधवारी दिले.ओमायक्राॅन या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांसाठी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये संबंधित बालक हे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले असल्यास पात्र राहणार आहे. त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वत:च्या मोबाइल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही सुविधा १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. याशिवाय लसीकरण केंद्रांवरही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. याकरिता स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित करण्याचे निर्देश असले तरी आरोग्य यंत्रणेजवळ मनुष्यबळाचा अभाव असल्याने सध्या सुरू असलेल्या १५५ लसीकरण केंद्रांवरच ही सुविधा राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. शासन निर्देशानुसार यामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येणार असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले. लसीकरण केंद्रांवर बालकांकरिता केंद्रांवर स्वतंत्र रांगा राहणार आहेत.
३९ आठवडे झाल्यानंतरच ज्येष्ठांना बूस्टर डोस६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सल्ल्याने १० जानेवारीपासून बूस्टर (प्रिकॉशन) डोस देण्यात येणार आहे. हा डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असावेत, ही अट आहे. याकरिता डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखविण्याची केंद्रांवर गरज नाही. शासकीयमध्ये मोफत व खासगीत पूर्वीच्या दराने लसीकरण सुविधा उपलब्ध राहणार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्करलाही बूस्टरकोरोनालढ्यात अग्रस्थानी असलेल्या हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाइन वर्करलाही आता १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या गटातही दुसऱ्या डोसनंतर ३९ आठवडे पूर्ण झाले असावे ही अट आहे. मात्र, या लाभार्थींना नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल व हे लसीकरण फक्त शासकीय केंद्रावरच करण्यात येणार आहे. कोविन सिस्टीममधून अशा व्यक्तींना एसएमएस मिळतील.