कामगारांच्या बोनस मागणीवरुन बाचाबाची, एमआयडीसीतील कंपनीत तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 19:31 IST2020-11-07T19:30:16+5:302020-11-07T19:31:21+5:30
युवा स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन : दिवाळीपूर्वी कामगारांचे वेतन, बोनसची मागणी, गुन्हा दाखल

कामगारांच्या बोनस मागणीवरुन बाचाबाची, एमआयडीसीतील कंपनीत तोडफोड
अमरावती : दिवाळीपूर्वी कामगारांचे वेतन व बोनस न दिल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तेथील व्यवस्थापकाने उडवाउडवीचे उत्तर दिल्यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी नांदगावपेठ एमआयडीसीतील ईंडो फॅब कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
युवा स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी येथील खुर्च्या व काचेचे टी- टेबल कार्यालयाबाहेर फेकले. याप्रकरणी युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. युवा स्वाभिमानी संघटनेचे युवा अध्यक्ष नीलेश भेंडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पराग चिमोटे, रवी अडोकार, गणेश मारोटकर, सदाम हुसेन, अनूप खडसे, सुमित गवळी सहभागी होती. कंपनीचे व्यवस्थापक मोहन नाना भांबरे यांच्या तक्रारीवरून नीलेश भेंडे व इतर ९ ते १० जणांविरुद्ध भादंविचे कलम १४३,४४७,१४९,१८८ अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती नांदगावपेठेचे ठाणेदार कुरळकर यांनी दिली.