‘त्या’ कंत्राटदार एजन्सीला महापालिकेत ‘नो एन्ट्री’
By Admin | Updated: April 2, 2017 00:07 IST2017-04-02T00:07:08+5:302017-04-02T00:07:08+5:30
दैनंदिन साफसफाईला फाटा देऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या सफाई कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

‘त्या’ कंत्राटदार एजन्सीला महापालिकेत ‘नो एन्ट्री’
काळ्या यादीत : गुरुवारी आदेश निर्गमित
अमरावती : दैनंदिन साफसफाईला फाटा देऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या सफाई कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे संस्थेला महापालिका क्षेत्रात काम करता येणार नाही किंवा कुठली निविदाही भरता येणार नाही. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी गुरूवारी सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित केलेत.
इसराजी बहुउद्देशीय संस्थेला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांनी २५ मार्च रोजी हिरवी झेंडी दिली होती. नोटशिटवर स्वाक्षरी करून शेटे यांना त्याबाबत आदेश पारित करावयाचे होते. मात्र, आदेश काढण्यास होणारा उशीर पाहता त्या कंत्राटदाराने ‘ब्लॅकलिस्ट’ होण्यापासून वाचण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजविले. बहुतांश बड्या अधिकाऱ्यांच्या दालनाची धूळ माथी लावून या कंत्राटदाराने ‘सहीसलामत’ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
‘रि-इस्टेट’चे आश्वासन
अमरावती : प्रभागातील नगरसेवकांसह महापौरांकडे धाव घेतली. आदेश निघायचा असल्याने त्या कंत्राटदाराला मोठी संधी मिळाली. अखेर ३० मार्चला सायंकाळी ‘इसराजी’ या कंत्राटदार संस्थेच्या ‘ब्लॅकलिस्ट’ होण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान आदेश निघाला तरी काही बिघडले नाही. आठवडाभरात ‘रि-इस्टेट’ करू, असा शब्द एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या कंत्रादाराला दिल्याचे समजते.
रामपुरी कॅम्प प्रभाग क्र. ५ मध्ये दैनंदिन स्वच्छतेचे कंत्राटदार इसराजी महिला सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेकडे सोपविण्यात आले होते. मात्र या संस्थेने अर्धेच कामगार कामावर लाऊन अटी-शर्तींचा भंग केला. स्वच्छतेत कुचराई केली. यासंस्थेच्या कामगारांनी संप केल्याने आरोग्याचा गहण प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत महापालिकेकडून त्याला वारंवार कळविण्यात आले. सुधारणा करण्याची संधी देण्यात आली. मात्र, दैनंदिन स्वच्छतेच्या कामात ‘इसराजी’ने कुठलीही सुधारणा केली नाही. महापौरांसह संबंधित प्रभागातील नगरसेवकांनीही याबाबत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. आता त्या संस्थेसाठी महापालिकेचे द्वार बंद झाले आहे. (प्रतिनिधी)
कळीचा नारद कोण ?
‘ब्लॅकलिस्ट’च्या कारवाइतून वाचण्यासाठी ‘इसराजी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरकस प्रयत्न केले. यातच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला ही कारवाई मागे घेऊ, असे शब्द दिल्याने ही कारवाई मागे तर घेण्यात येणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे महपौरांच्या तक्रारीनंतर व कारवाईचा आदेश निघाल्यानंतरही कारवाई मागे घेण्याचा शब्द देणारा तो कळीचा नारद कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कंत्राट रद्द
सन २०१६-१७ वर्षासाठी हे कंत्राट असल्याचे आदेशात नमूद आहे. अनियमिततेमुळे रामपुरी कॅम्पमधील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट ३१ मार्च २०१७ पासून रद्द करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे नाव मनपाच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे.