सततची दारू आणि शिवीगाळ; कंटाळून पत्नीने हातात असलेल्या मोगरीनेच केली पतीची हत्या
By प्रदीप भाकरे | Updated: March 11, 2026 18:23 IST2026-03-11T18:23:01+5:302026-03-11T18:23:55+5:30
Amravati : दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना वलगावजवळील खारतळेगांव येथे घडली आहे.

Constant alcohol and abuse; Fed up, wife kills husband with a machete in her hand
अमरावती : दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना वलगावजवळील खारतळेगांव येथे घडली आहे. कपडे धुण्याच्या मोगरीने केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाला असून, बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. मंगेश देविदास गोटे (वय ४४, रा. खारतळेगांव) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनुसार, मंगेश आणि त्याची आरोपी पत्नी छाया (वय ३४) यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंगेशला दारूचे व्यसन होते आणि तो नेहमी दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असे. छाया मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होती. मंगळवारी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास छाया घरात कपडे धुवत असताना मंगेश दारूच्या नशेत घरी आला. त्याने छायाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी झालेल्या वादात संतापलेल्या छायाने हातात असलेल्या धुण्याच्या मोगरीने मंगेशवर प्रहार केले. या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.