चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन परीक्षेत घोळ!

By उज्वल भालेकर | Updated: December 21, 2024 19:02 IST2024-12-21T18:28:46+5:302024-12-21T19:02:36+5:30

परीक्षा रद्द ; विद्यार्थ्यांचे उत्तर बदलत असल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ

Confusion in Chandrapur District Central Cooperative Bank online exam! | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन परीक्षेत घोळ!

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन परीक्षेत घोळ!

- उज्वल भालेकर 

अमरावती : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रिक्त असलेल्या लिपिक, तसेच शिपाई पदांसाठी ऑनलाईन परीक्षांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. शहरातील विभागीय क्रिडा संकुल परिसरात प्रोबीटी इन्फोटेक येथील केंद्रावर ही परीक्षा सुरु होती. परंतु सकाळी १० वाजताच्या पहिल्याच शिफ्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन टिक केलेले उत्तर हे काही वेळाने बदलत असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनाही या केंद्रावर बोलविण्यात आले होते. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या गोंधळाची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाने देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील २६१ लिपिक तर ९७ शिपाई पदाकरिता ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी राज्यभरातील ३७ केंद्रावर ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. 

या परीक्षा दिल्ली येथील एका आयआयटी कंपनी मार्फत घेण्यात आल्या. शहरातील विभागीय क्रिडा संकुल परिसरात प्रोबीटी इन्फोटेक येथील केंद्रावर ही परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु पहिल्याच शिफ्टला गोंधळ उडाला काही विद्यार्थ्यांचे उत्तर हे सबमिट होत नसल्याचे तसेच काहींचे उत्तरे अचानक चेंज होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ करताच आयआयटी कंपनीने परीक्षा रद्द करून सदर परीक्षा २३ डिसेंबरला घेणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे काही विद्यार्थ्यांनी प्रहारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या परीक्षेतील घोळाची चौकशी करण्याची मागणी केली. महानगराध्यक्ष बंटी रामटेके, छगन चव्हाण, रोशन गवई, कुणाल खंडारे उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी पुण्याहून आलो. रात्र अमरावती रेल्वे स्टेशनवर काढून सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलो. परंतु पेपर सुरु झाल्यानंतर एक तासाने आपले उत्तर चेंज होत असल्याचे लक्षात आले. याची माहिती केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दिल्यावर त्यांनी कॅम्पुटर बंद केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगून २३ डिसेंबरला पेपर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परीक्षेतील या गोंधळाची चौकशी होणे गरजेचे आहे.
- छगन चव्हाण, परीक्षार्थी
 

Web Title: Confusion in Chandrapur District Central Cooperative Bank online exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.