नियोजनाचा अभावाने सावळागोंधळ, २० टक्केच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:16+5:302021-06-27T04:10:16+5:30
अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत ...

नियोजनाचा अभावाने सावळागोंधळ, २० टक्केच लसीकरण
अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे रोज अर्धेअधिक केंद्रे बंद राहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत २० टक्केच लसीकरण झाले आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा मनस्ताप होत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पुरवठ्यात सातत्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी केंद्रे नेहमी बंद राहतात. आतापर्यंत मागणीच्या तुलनेत अर्धाच म्हणजे ५,७६,६४० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कोविशिल्ड ४,५२,६३० व कोव्हॅक्सिनचे १,२४,०१० डोस प्राप्त आाहेत. यामध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या सद्यस्थितीत ३० लाखांचे घरात आहे. त्यामुळे झालेले लसीकरण हे १९.४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. लसीकरणाची अशीच मंदगती राहिल्यास २०२२ मध्येही लसीकरण पूर्ण होणार की नाही, याबाबत नागरिक साशंक आहेत.
पाईंटर
आतापर्यंत झालेले लसीकरण : ५८२,२०७
अमरावती महापालिका क्षेत्र : १,९९,१६७
ग्रामीणमधील लसीकरण : ३,८३,०४०
पाईंटर
लसीचा पुरवठा : ५,७६,६४०
कोविशिल्ड : ४५२,६३०
कोव्हॅक्सिन : १,२४,०१०
बॉक्स
असे झाले लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ३५,०९४, फ्रंट लाईन वर्कर ५४,९८५, १८ ते ४४ वयोगटात ४७,३४९, ४५ ते ५९ वयोगट २,०८,८१६ तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक २,३५,९६३ असे एकूण ५,८२,२०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ४,३६,५५० व दुसरा डोज १,४५,६५७ नागरिकांनी घेतला असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.
बॉक्स
ग्रामीणमध्ये माहितीच मिळत नाही
आरोग्य विभागाद्वारा रात्री नियोजन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लसीकरणाला सुरुवात होते. यामध्ये कुठल्या केंद्रांवर, कोणत्या वयोगटात, कोणत्या लसीचा, कोणता डोस देण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे नागरिक केंद्रांवर जातात व त्यांना आवश्यक असणारा डोस उपलब्ध नसल्यामुळे माघारी परत येत असल्याचे वास्तव आहे.