ग्रामपंचायतींमधील संगणक धूळ खात
By Admin | Updated: May 5, 2014 00:21 IST2014-05-05T00:21:35+5:302014-05-05T00:21:35+5:30
ग्रामपंचायतीचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा या उद्देशाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या उपक्रमाद्वारे राज्यातील ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आले.

ग्रामपंचायतींमधील संगणक धूळ खात
अमरावती : ग्रामपंचायतीचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा या उद्देशाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या उपक्रमाद्वारे राज्यातील ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आले. या ठिकाणी संगणक परिचालकाची नियुक्तीदेखील करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत अनेक ग्रामपंचायतीमध्ये संगणक धूळ खात पडले आहेत. भारनियमनामुळे ई-ग्रामपंचायतीचा फज्जा उडाला आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च करून शासनाने ग्रामपंचायतीचा सर्व कारभार संगणकाद्वारे करण्याचे ठरविले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये यावर्षीपासून बँकिंग सुविधा निर्माण करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये केवळ ‘आॅनलाईन’ काम असेल तर संगणक आॅपरेटर हे ग्रामपंचायत कार्यालयात दिसतात. इतर दिवसी ग्रामपंचायतीचे दाखले हे इतर कर्मचारी हस्तलिखित स्वरुपात देतात. विशेष म्हणजे ग्रामपंचायत संगणक आॅपरेटरची नियुक्ती ही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाने झाली असल्यामुळे अनेक आॅपरेटरांना संगणकाचे पुरेसे व अद्ययावत ज्ञान नाही. अनेक संगणक आॅपरेटर हे कामावर दांडी मारतात. मुळात ग्रामपंचायतीचा सचिव हाच दररोज ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे या आॅपरेटरचे फावते व तेदेखील कधीकाळी दांडी मारतात. त्यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणक उपयोगात न येता केवळ शोभेची वस्तू बनले आहेत व ग्रामपंचायतीचा कारभार पूर्वीप्रमाणेच हस्तलिखितावर सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. (प्रतिनिधी)