कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:03 IST2017-04-03T00:03:58+5:302017-04-03T00:03:58+5:30

इंग्रजी माध्यमाचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला.

Coaching classes teacher sexually abused student | कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

सिंधी कॅम्प परिसरातील घटना : आरोपी मनोज पांडे पसार
अमरावती : इंग्रजी माध्यमाचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला. पीडित विद्यार्थिनीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून आरोपी संचालक मनोज पांडे पसार झाला आहे.
सिंधी कॅम्प परिसरातील क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. २० वर्षीय पीडिताच्या तक्रारीनुसार, सदर मुलगी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेते. जानेवारी २०१६ मध्ये सिंधी कॅम्प परिसरातील क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीत तिने लेखाकर्म (अकाऊंट) विषयासाठी शिकवणी वर्ग लावला होता. अ‍ॅकेडमीचे संचालक व शिक्षक मनोज पांडे हे ५० ते ६० विद्यार्थिनींना लेखाकर्म (अकाऊंट) विषय शिकवितो. त्यात पीडित मुलीचाही समावेश होता. मनोज पांडेची नजर त्या मुलीवर पडली. एके दिवशी शिकवणी वर्ग संपल्यानंतर मनोजने त्या मुलीला थांबण्याचा इशारा केला. ती नि:संकोचपणे थांबलीसुद्धा. त्यावेळी मनोज पांडेने तिला एका वर्ग खोलीत नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून मुलगी निघून गेली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मनोज पांडेने त्या मुलीच्या मोबाईलवर कॉल करून माझ्यासोबतचा तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. तिला फ्लॅटवर बोलावून लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार वर्षभर सुरू राहिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हा गंभीर प्रकार त्या मुलीने तिच्या कुटुंबीयासमोर कथन केला. त्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पीडिताने तक्रार दिली. शनिवारी मध्यरात्री पीडित मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात मनोज पांडेविरुद्ध तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)

पालकांनो सावधान, आणखी काही मुलींचे शोषण
क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. त्यांच्या शिकवणी वर्गात ५० ते ६० विद्यार्थिंनी इंग्रजीचे शिक्षण घेत आहेत. पांडेने आठ ते दहा विद्यार्थिनींवरसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला असून त्या दिशेने गाडगेनगर पोलीस तपास करीत आहे.

कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी प्राप्त झाली. त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सद्यस्थितीत आरोपी पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
- कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे

Web Title: Coaching classes teacher sexually abused student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.