राणा दाम्पत्याच्या भेटीला मुले गेलीत दिल्लीला; १८ दिवसांनंतर आई-वडिलांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 15:42 IST2022-05-10T14:59:38+5:302022-05-10T15:42:13+5:30
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली होती. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे.

राणा दाम्पत्याच्या भेटीला मुले गेलीत दिल्लीला; १८ दिवसांनंतर आई-वडिलांना भेटणार
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना १४ दिवस कारागृहात राहावे लागले. या काळात त्यांची मुले ही अमरावती येथील ’गंगा-सावित्री’निवावस्थानीच होते. अखेर मुलगी आरोही आणि मुलगा रणवीर हे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ही मुले आई-वडिलांना तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भेटणार आहे, हे विशेष.
खासदार, आमदार राणा दाम्पत्यांनी २३ एप्रिल रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईत रणकंदन माजले होते. मातोश्रीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्रित झाले होते. कायदा व सुव्यवस्थिचा प्रश्न निर्माण होईल, अशी स्थिती मातोश्रीसमाेर झाली होती. अखेर मुंबईच्या खार पोलिसांनी २२ एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांना नोटीस बजावून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या प्रकारावरून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे.
राणा दाम्पत्याच्या भेटीला मुले गेलीत दिल्लीला; १८ दिवसांनंतर आई-वडिलांना भेटणार #navneetraviranapic.twitter.com/dsKhNdcnAt
— Lokmat (@lokmat) May 10, 2022
खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, कारागृहात राणा दाम्पत्यांना व्यवस्थित वागणूक दिली नाही. जेवण नित्कृष्ट होते. प्रकृती चांगली नसताना उपचारासाठी बाहेर जावू दिले नाही, असा आरोप राज्य शासनावर खासदार नवनीत राणा यांनी लावला आहे. किंबहुना राणा दाम्पत्यांनी सोमवार,९ मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या राजद्रोह गुन्ह्याविषयी कैफियत मांडली. मात्र, गत १८ दिवसांपासून मुलांची भेट झाली नव्हती. राणा दाम्पत्य कासावीस झाले होते. अखेर मंगळवारी मुलगी आरोही आणि मुलगा रणवीर हे दोघेही आई-वडिलांचा भेटीसाठी गेले आहेत.