अमरावती जिल्ह्यात चिकुनगुनियाचा कहर ; नऊ महिन्यांत २८२ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 20:16 IST2025-10-16T20:15:51+5:302025-10-16T20:16:19+5:30
Amravati : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्क्रब टायफसचेदेखील दोन रुग्ण आढळल्याची माहिती यंत्रणेने दिली.

Chikungunya wreaks havoc in Amravati district; 282 patients in nine months
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या आजाराचे प्रमाण वाढले असून, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान चिकुनगुनियाचे तब्बल २८२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्यादेखील ३१० इतकी पोहोचली आहे; परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे जिल्हा हिवताप विभागाचे म्हणणे आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कीटकजन्य आजारांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. यात आरोग्य विभागाकडून फॉगिंग, लार्वानाशक फवारणी, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात येते. तसेच नागरिकांनी घराच्या परिसरात साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, कुलर, फुलदाणी, टाक्या, बादल्या यामध्ये डासांची पैदास होऊ नये, यासंदर्भात जनजागृती केली जाते; परंतु तरीही यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
नऊ महिन्यांत २८२ रुग्ण
जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २८२ रुग्ण आढळले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात ६३ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २१९ रुग्ण आढळले. त्याचबरोबर डेंग्यूच्या ३१० रुग्णांपैकी २२९ हे ग्रामीण भागात तर मनपा क्षेत्रातील ८१ रुग्ण आहेत.
वेळीच घ्या काळजी
चिकुनगुनिया व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये उच्च ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न घेतल्यास रक्तपेशींची संख्या घटू शकते आणि रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच रुग्णालयात जाणे गरजेचे आहे.
मलेरियाचे रुग्ण वाढले
चिकुनगुनिया, डेंग्यू आजारांबरोबरच यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत १३६ मलेरियाचे रुग्ण आढळले. यामध्ये ग्रामीण भागात १२६ आणि शहरात १० रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये मुंबईतून परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
"नऊ महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे ३१० रुग्ण असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या यंदा घटली आहे. परंतु, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, ती २८२ इतकी झाली आहे. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी हिवताप विभागाकडून सर्व प्रयत्न केले जातात."
- डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी