मुख्यमंत्री साहेब, कुठे गेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प?
By Admin | Updated: December 29, 2016 01:45 IST2016-12-29T01:45:09+5:302016-12-29T01:45:09+5:30
मागील वर्षी १ आॅक्टोबरला संत्रा परिषदेच्या उदघाटनाला आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री साहेब, कुठे गेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प?
संत्रा उत्पादकांना धक्का : गव्हाणकुंडचा प्रकल्प गेला हिवरखेडात
संजय खासबागे वरुड
मागील वर्षी १ आॅक्टोबरला संत्रा परिषदेच्या उदघाटनाला आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूडमध्ये राज्यातील पहिला संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन हवेतच विरले आहे. उलट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सचिवाला पाठवून कोकाकोला आणि जैैन इरिगेशनचा संयुक्त प्रकल्प गव्हाणकुंडला साकारण्याकरीता चर्चा केली. परंतु श्रेयासाठी राजकिय विरोध झाल्याने हा प्रकल्प हिवरखेड (ठाणाठूणीला) गेला आहे. आता निदान मुख्यमंत्री संत्रा डिहायड्रेशन प्रकल्पाकरीता दिलेला शब्द पाळणार काय, हा प्रश्न आहे.
विदर्भाचा कॅलीफोर्निया वरूड तालुका उद्योगांअभावी माघारला आहे. संत्र्यासह इतर फळांवर प्रक्रिया करणारा उद्योग येथे आल्यास संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार, हे निश्चित असताना राज्यकर्ते यामध्ये अपयशी ठरले, ही संत्रा उत्पादकांची शोकांतिका आहे. आता तर गव्हाणकुंडात होऊ घातलेला प्रकल्प हिवरखेडात गेल्याने संत्रा उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून २१ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्र्याची लागवड आहे. संत्राची साठवणूक करण्याकरीता शितगृहे तर प्रक्रियेसाठी प्रक्रिया केंद्र नाही. लिंबूवर्गिय फळांसाठी येथे संशोधन केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी आजवर ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. आता तरी मुख्यमंत्री त्यांनीच केलेल्या घोषणेची पूर्तता करतील काय, हा प्रश्न आहे.
शितगृहासह ग्रेडिंग, व्हॅक्सीनेशनचा प्रयत्न फसला
संत्रा उत्पादकांना न्याय मिळावा म्हणून संत्रा साठवणूक, ग्रेडींग आणि व्हॅक्सीनेशन करण्याचे उद्देशाने वासुदेव देशपांडे यांच्या पुढाकाराने आॅरेंज सिट्रस किंग या नावाने शितगृह, आणि व्हॅक्सीनेशन प्रकल्प सुरु करुन हॉलंड, दुबई सह आदी अरब राष्ट्रात येथून संत्राचे कंटेनर भरुन गेले. सहकारी तत्वावरची ही संस्था सुद्धा डबघाईस आली. यानंतर बाजार समितीचे तत्कालीन सभापती रमेश वडस्कर आणि नरेंद्र चोरे यांनी ही यंत्रणा खरेदी करुन संत्राला योग्य भाव आणि साठवणूक करण्याकरीता प्रयत्न केले. असे अनेक प्रकल्प सहकारी तत्वावर उभे राहिले आणि फसलेत.
परप्रांतीय बाजारपेठेत भाव घसरले
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येत असत. परंतु काळाच्या ओघात राजस्थानची संत्री आणि पंजाबच्या किन्नूने संत्र्यावर मात्र केली. याचा फटका येथील संत्रा उत्पादकांना बसत आहे. कोटयवधी रुपये मिळवून देणाऱ्या वरुड तालुक्यात संत्राप्रक्रिया करणारा कारखाना नसल्याने संत्रा उत्पादकांची वाताहत झाली आहे. संत्रा उत्पादकासह व्यापारी सुध्दा हवालदिल झाले आहे.