घरात एकटी पाहून 'त्याने' काढली छेड, 'तिने' रणरागिणीचा अवतार घेत दिला लाथाबुक्क्यांचा प्रसाद
By प्रदीप भाकरे | Updated: September 23, 2022 18:34 IST2022-09-23T18:27:21+5:302022-09-23T18:34:49+5:30
विनयभंग : बिंग फुटल्यावर म्हणाला, मै उससे मजाक कर रहा था

घरात एकटी पाहून 'त्याने' काढली छेड, 'तिने' रणरागिणीचा अवतार घेत दिला लाथाबुक्क्यांचा प्रसाद
अमरावती : घरात एकटी असलेली तरुणी सहज सावज होईल, असा त्याचा होरा. मात्र, तिने रणरागिणीचा अवतार घेत त्याचा पार चोळा केला. त्याच्या गालावर चपराक हाणत, पोटावर लत्ताप्रहार करून तिने शील वाचविले. तो जीव वाचवत पळून गेला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालाबपुरा परिसरात २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी युनुसखान युसुफ खान (रा. तालाबपुरा) याच्याविरुद्ध विनयभंग तथा अश्लील शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारकर्ती तरुणी ही आठ-दहा दिवसांपूर्वी बहिणीच्या घरी आली होती. तिची बहीण कामानिमित्त बाहेर गेली असता आरोपी त्या घरात शिरला. तरुणी ही मोबाइल पाहत बसली असता आरोपीने तिची छेड काढली. तो बळजबरी करण्याच्या प्रयत्नात असताना ती चटकन सावरली. गालावर थापड लगावली, पोटावर लाथ मारून स्वत:ची सुटका केली. दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिने दार आतून बंद केले. बाहेर गेलेल्या बहिणीला फोन करून तिने घटनेची माहिती देऊन घरी बोलाविले. त्यावेळी आरोपीने बंद दाराला बाहेरून लाथा मारल्या. त्यावेळी तरुणीची आत्या बाहेर अंगणात पाणी भरत होती. आरडाओरड ऐकून ती घरात आली. तिला त्रास का देत आहे, अशी विचारणा केल्याने तो निघून गेला.
तरुणीची बहीण आल्यावर तिने आरोपी युनुस खान याला घरी बोलावून ती तुझ्या बहिणीसारखी आहे, तिच्या सोबत असे का केले, असा जाब विचारला. त्यावर आरोपीने ‘मै उससे मजाक कर रहा था’ असे म्हटले. त्यावेळी राग अनावर झालेल्या तरुणीने त्याही वेळी आरोपीला दोन थप्पड लगावल्या. सबब, आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करून तिच्या पोटावर लाथ मारली. तुला बाहेर पाहून घेईल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. याबाबत रात्री १२ च्या सुमारास तक्रार दाखल करवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला.