नांदगावपेठ - पांढुरणा महामार्गावरील सिमेंट रोडला पडल्या भेगा
बेनोड्याच्या पुलावर जीवितहानी होण्याची शक्यता,
ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) नांदगाव पेठ ते पांढुरणा सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. मात्र, बेनोडा येथील पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत पुलावर मोठमोठे खड्डे पडून स्लॅपचे गज उघडे पडले. त्यामुळे आता याठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. या गंभीर समस्येची दखल घेत प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रुग्ण मित्र व सामाजिक कार्यकर्ते इनामभाई यांनी याविषयीची तक्रार आ. देवेंद्र भुयार यांचेकडे केली. आ. देवेंद्र भुयार आक्रमक होऊन त्यांनी लगेच इन्फ्रा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दूरध्वनीवरून करून दिली. तरीसुद्धा पुलावर पडलेल्या खड्ड्यांची गंभीरता लक्षात घेतल्या गेली नाही.
नांदगाव पेठ ते पांढुरणापर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या दीड ते दोन वर्षांमध्येच अनेक ठिकाणी भेगा गेल्यामुळे नांदगाव पेठ - पांढुरणा महामार्गाच्या कामातील दर्जावर महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथील वाहन चालक व नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या नवीन महामार्गावरील सिमेंट रोडवर पडलेल्या भेगा या मोठ्या आकाराच्या असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
अमरावती, मोर्शी, वरूड, पांढुरणा हा मध्यप्रदेशाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथील नागरिकांना या महामार्गामुळे दिलासा मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. बऱ्याच वर्षांपासून हा महामार्ग डांबरी रोडचा असल्यामुळे जीवघेणे खड्डे पडलेले होते. त्यामध्ये अनेक वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातून वाहनचालकांना मुक्तता मिळावी म्हणून या महामार्गाचे काम करण्यात आले; परंतु नव्याने तयार करून बांधण्यात आलेल्या या अमरावती - पांढुरणा महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा गेल्याने झालेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप आता अनेक नागरिक व वाहनचालक करताना दिसत आहेत.
रस्ते व वाहतूकमंत्री म्हणून धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात अनेक महामार्गांची भरमसाठ कामे करण्यात आली असून, त्यामध्ये नांदगाव पेठ - पांढुरणा महामार्गाकरिता ५३० कोटी रुपये उपलब्ध करून अमरावती - पांढुरणा या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, ठेकेदाराच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन रस्त्याला भेगा पडून महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडत आहेत. या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी इनामभाई यांनी केली आहे.