'धमकी दिली तरच फोन करा' ११२ वर कॉल केला असता पोलिसांकडून चौकशीसाठी येण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:41 IST2025-10-31T20:40:54+5:302025-10-31T20:41:47+5:30
Amravati : संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी केला होता कॉल अवमानजनक शब्दांचा सामना

'Call only if threatened' When I called 112, the police refused to come for questioning
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : साहेब, माझ्या घरासमोर एक संशयित व्यक्ती सायंकाळी दिसला. त्याला हटकले असता, रात्री ९ वाजता तो परत सहकाऱ्याला घेऊन आला. याची माहिती ११२ क्रमांकावर कॉल करून देणाऱ्या शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला अवमानजनक पोलिसांकडून शब्दांचा सामना करावा लागला.
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची हेल्पलाइन म्हणून ११२ या क्रमांकावर डायल केले जाते. मंगळवारी रात्री ९ वाजता शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा कंत्राटदार प्रमोद डेरे यांनी कॉल करून दोन संशय ते इसम घराकडे फिरत असल्याची माहिती दिली. पोलिसांना कॉल केल्यावर मदत मिळेल, ही त्यांची अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णतः फोल ठरली.
मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता प्रमोद डेरे यांच्या घरासमोर एक संशयास्पद इसम सिगारेट पीत उभा होता. त्यांनी त्याला हटकले असता, तो निघून गेला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास परत तो दुसऱ्या सहकाऱ्यासह आला.
डेरे यांचा संशय बळावल्याने त्यांनी ११२ या क्रमांकावर डायल केले. उलटटपाली त्यांना फोनवर विविध प्रश्नांची सरबत्ती केली गेली. त्या व्यक्तीने तुम्हाला शिवीगाळ केली का? धमकी दिली का मग आम्ही येऊ शकत नाही, म्हणत आपल्या कर्तव्याचा परिचय दिला. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर डेरे यांनी स्पष्ट केला. त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चोऱ्या वाढल्या
जुळ्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणातच चोरीचे सत्र सुरू आहे. बंद घरे निशाण्यावर असताना मंदिरेसुद्धा चोरट्यांनी सोडले नाहीत.
"आपण सक्षम आहोत; परंतु संशयित व्यक्ती दिसल्यावर पोलिसांना माहिती देणे माझे कर्तव्य होते. मात्र, त्याउलट अपमानास्पद वागणूक मिळाली."
- प्रमोद डेरे, परतवाडा