वैभव बाबरेकर अमरावती वडाळीतील मध्यवर्ती रोपवाटिकेजवळ 'कॅक्टस वर्ल्ड' उद्यान साकारण्यात आले असून त्या वृक्षांच्या ३०० प्रजाती ओरिसा व पश्चिम बंगालवरून आणण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील हे पहिलेच भव्य-दिव्य ‘कॅक्टस उद्यान’ असून ते अमरावतीत साकारण्यात आले आहे. पडित जागेवर फुलले उद्यान अमरावती : भारतात कॅक्टसच्या पाच हजारांवर प्रजाती आहेत. वडाळीतील उद्यानात त्यापैकी ३०० प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. अत्यंत देखण्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या याउद्यानात आता पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. याउद्यानाला ‘कॅक्टस वर्ल्ड उद्यान’असे नाव देण्यात आले असून मुख्य वनसरंक्षक संजीव गौड यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. कॅक्टस हे उष्णकटिबद्ध प्रदेशात वाढणारे झाड असून अत्यल्प पाण्यावर ते जगते. त्यामुळे वडाळी रोपवाटिकेशेजारी असणाऱ्या ‘ड्रायझोन’मध्ये हे उद्यान साकारण्यात आले आहे. ५० वर्षांपासून ही जागा पडिक होती. परिसरात दगडांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याठिकाणी वृक्षलागवड होत नव्हती. त्यामुळे कॅक्टस उद्यानासाठी ही जागा निवडण्यात आली. अत्यल्प पाण्यावर जगणाऱ्या ‘कॅक्टस’ची लागवड केल्याने आता याठिकाणी कॅक्टसच्या अतिशय सुंदर ३०० प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्ल्यू कॅक्टस, मॅमेलिरिया, अॅस्टोफायटम, इचोनिग्रोसेनी, जिमनो कॅल्शीअम, पॅचीपॅडम, नोटो, फेअरो, मेलो आदी प्रजातींचा समावेश आहे. काही झाडांना अत्यंत सुंदर फुले सुद्धा आली असून ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहेत. कॅक्टस उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी माळी किशोर राऊत यांच्याकडे असून त्यांनी विविध राज्यात फिरून कॅक्टसविषयक माहिती गोळा करून त्यांचे संगोपन केले आहे. याउद्यानात १ हजारावर कॅक्टस प्रजातींची लागवड करण्याचा राऊत यांचा मानस आहे. आठ महिन्यांपूर्वी उद्यानात लावलेल्या कॅक्टसच्या रोपट्यांची पूर्णत: वाढ झाली असून काहींना फुलेही आली आहेत. वडाळीच्या निसर्गरम्य वातावरणातील पडिक जागेला या उद्यानामुळे शोभा आल्याने पर्यटकांचीही हे आगळे उद्यान पाहण्याकरिता गर्दी होत आहे. ३०० प्रजाती : ओडिशा, प. बंगालचे कॅक्टस औषधीयुक्त कॅक्टस कॅक्टस उद्यानात अॅपोन्शिया इचोनीग्रोसीनी ही वनस्पती औषधीयुक्त आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हे कॅक्टस आढळून येत आहे. यावर देश-विदेशात संशोधन सुद्धा सुरु आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील औषधी यापासून तयार केली जाते. कॅलेस्ट्रोल व मधुमेहावर देखील हे गुणकारी औषध आहे. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा कॅक्टसचा उपयोग होतो. उद्यानात कॅक्टसच्या ३०० प्रजाती आहेत. हे महाराष्ट्रातील पहिले उद्यान आहे. अत्यल्प पाण्यावर जगणाऱ्या कॅक्टसची रोपटी अत्यंत सुंदर व देखणी आहेत. पुढील काळात हजार प्रजातींच्या लागवडीचे लक्ष्य आहे. -किशोर राऊत, माळी, वडाळी वनविभाग.
वडाळीत कॅक्टस वर्ल्ड उद्यान
By admin | Updated: January 5, 2017 00:09 IST