रेतीचे भाव वधारल्याने घरांचे बांधकाम ठप्प
By Admin | Updated: January 7, 2016 00:32 IST2016-01-07T00:32:19+5:302016-01-07T00:32:19+5:30
प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर बांधण्याकरिता पोटाला चिमटा घेऊन एक एक पैसा गोळा करुन आपल्या स्वप्नातले घर तयार करतात.

रेतीचे भाव वधारल्याने घरांचे बांधकाम ठप्प
चांदूरबाजार : प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर बांधण्याकरिता पोटाला चिमटा घेऊन एक एक पैसा गोळा करुन आपल्या स्वप्नातले घर तयार करतात. आज हे बांधकाम करण्याकरिता गलेलठ्ठ पैसा लागतो. सद्यस्थितीत रेती व गिट्टीचे दर गगनाला भिडल्याने घरांचे बांधकाम ठप्प पडले आहे.
‘एक बंगला बने न्यारा’ या गाण्याप्रमाणेच प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे, अशी मनापासून इच्छा असते. त्याकरिता प्रत्येकजण आपले घर नावीन्यपूर्ण असावे, याकरिता बांधकामावर मोठा खर्च करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांधकाम साहित्याचे दर वाढतच चालले आहेत. अलिकडे तर रेतीचे भाव गगनाला भिडल्याने बांधकामे ठप्प पडल्याचे चित्र आहे.
कोणतेही बांधकाम करताना सर्वात जास्त प्रमाणात रेती व गिट्टीचा उपयोग केला जातो. मात्र, यावर्षी रेती व गिट्टीचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे स्वत:चे घर बांधण्याचे सर्वसाधारण नागरिकांचे स्वप्न हवेतच विरत आहे. महागाई आकाशाला भिडली असताना घरबांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव कमालीचे वाढले आहे. घरबांधकामात सर्वात स्वस्त असणाऱ्या रेतीचे भाव यावर्षी ५००० ते ५५०० रुपये प्रती ब्रासवर पोहचल्याने आता १ ट्रक रेती १० ते ११ हजार रुपयांना मिळणार आहे.
एकेकाळी रेतीला कोणतेही भाव नव्हते. शासनाचा कोणताही कर नसल्यामुळे ती मोफतच मिळत होती. मात्र, आज रेतीच्या भावांमुळे बांधकाम करु इच्छिणाऱ्या सामान्य माणसांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे. अलिकडे रेतीघाटांचे लिलाव चढ्या दराने होत आहेत.
त्यामुळे रेतीचे भाव दरवर्षी वाढतच आहेत. शासनाने एकीकडे रेती घाटापासून पैसा वसुली करण्याचे धोरण अवलंबिले असताना दुसरीकडे कंत्राटदाराने त्यापासून नफा मिळण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यावर्षी रेतीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. तुर्तास लोकांना दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)