विद्यापीठाला राज्यात अव्वलस्थानी आणू
By Admin | Updated: May 3, 2017 00:24 IST2017-05-03T00:24:30+5:302017-05-03T00:24:30+5:30
विस्तीर्ण जागा, शिक्षणाची वैभवशाली परंपरा व अनुकूल वातावरण यामुळे राज्यात अव्वलस्थान मिळविण्याची क्षमता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आहे.

विद्यापीठाला राज्यात अव्वलस्थानी आणू
ना.प्रवीण पोटे यांचा आशावाद : चार इमारतींचे लोकार्पण
अमरावती : विस्तीर्ण जागा, शिक्षणाची वैभवशाली परंपरा व अनुकूल वातावरण यामुळे राज्यात अव्वलस्थान मिळविण्याची क्षमता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, नवनवे प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे दिली.
विद्यापीठ परिसरातील डॉ.शिवाजीराव पटवर्धन संशोधक व पदव्युतर विद्यार्थी वसतिगृह, केंद्रीय मूल्यांकन भवनाची विस्तारित इमारत, कम्युनिटी स्टुडिओ आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिथीगृहाच्या चार इमारतींच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पोटे बोलत होते. कुलगुरु मुरलीधर चांदेकर अध्यक्षस्थानी होते. गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खा.आनंदराव अडसूळ, कुलसचिव अजय देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध बदलांना सामोरे जाताना नवनव्या अभ्यासक्रमांची रचना केली पाहिजे, असे सांगून ना. पाटील म्हणाले की, अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये देखील यश मिळवावे, यादृष्टीने अमरावती विद्यापीठाकडून प्रयत्न होत आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांनी उद्योगक्षेत्रात आठ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. त्या उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ विद्यापीठाने निर्माण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाने चारही इमारतीचे काम उत्कृष्टरित्या व वेळेत पूर्ण केल्याबद्दल ना. रणजित पाटील यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिथीगृहाची तसेच ध्यानधारणा केंद्राची निर्मिती ही अभिनव व स्वागतार्ह बाब असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, बदलत्या काळात शिक्षणाला कौशल्याची जोड देण्यासाठी विद्यापीठाकडून अधिक प्रयत्न व्हावेत. विद्यापीठाने संशोधनाला चालना देणाऱ्या अभ्यासक्रमावर भर द्यावा व तंत्रज्ञानात गतीने होणाऱ्या बदलांची दखल घेत वेळोवेळी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना यावेळी खा.अडसूळ यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या विकासासाठी शासनाची भूमिका सदैव सकारात्मक राहिल्याचे कुलगुरु चांदेकर यांनी सांगितले. नवे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख राहील असा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक कुलसचिव अजय देशमुख यांनी तर जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी संचालन केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे गणेश मालटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)