श्वानांची भरमसाठ पैदास, खरेच निर्बीजीकरण झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:03 PM2018-01-13T23:03:49+5:302018-01-13T23:05:30+5:30

शहरातील श्वानांची वाढती पैदास पाहता खरेच त्यांचे निर्बीजीकरण झाले काय, असा प्रश्न पशुप्रेंमीना पडला आहे.

Breeding of the swine, breeding really happened? | श्वानांची भरमसाठ पैदास, खरेच निर्बीजीकरण झाले?

श्वानांची भरमसाठ पैदास, खरेच निर्बीजीकरण झाले?

Next
ठळक मुद्देहालच हाल : रोगराई, अन्नाच्या कमतरतेने ओढावताहेत मृत्यू

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील श्वानांची वाढती पैदास पाहता खरेच त्यांचे निर्बीजीकरण झाले काय, असा प्रश्न पशुप्रेंमीना पडला आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार, शहरात नऊ हजार श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली असती, तर श्वानांच्या पैदासीला बे्रक नक्कीच लागला असता. परंतु, श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे त्यांना अन्नाची कमतरता भासत आहे, विविध रोगांनी ग्रस्त चार ते पाच श्वान दररोज दगावत आहेत तसेच अपघातात बळी जात असल्याची खंत पशुप्रेमींनी व्यक्त केली आहे.
निर्बीजीकरण शस्त्रक्रियेची योग्य प्रक्रिया पार न पडल्यामुळे शहरात श्वानांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. या वाढत्या संख्येमुळे श्वानांवर भूकबळीचे संकट ओढावले असून, ते विविध आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.
'केनाइन डिस्टेम्पर’चा विळखा
श्वानार्थ सेवा देणाºया वसा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील श्वानांची भयावह स्थिती उघड झाली आहे. शहरात पाच ते सहा हजारांपर्यंत श्वान असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मग महापालिकेने नऊ हजार श्वानांचे निर्बीजीकरण कसे केले असावे, हा प्रश्नही निर्माण होत आहे. या श्वानांपैकी सुमारे अडीच हजार श्वान हे 'केनाइन डिस्टेम्पर’ व ‘पारो’ या रोगाने ग्रस्त आहे. या रोगाचे शहरात थैमानच असून, मागील चार आठवड्यांमध्ये टोपेनगरातील सहा श्वानांचा डिस्टेम्पर या रोगाने मृत्यू झाला. महापालिका कर्मचारी श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करतात. त्यांचे कान कापून निर्बीजीकरणावर शिक्कोमोर्तब करतात. ७० टक्के श्वानांचे कान कापले असल्याचे वसाने निरीक्षण नोंदविले आहे. मात्र, श्वानांची वाढती पैदास निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
कुपोषित कुत्री, सात पिले जीवन-मरणाच्या दारात
कुलगुरूंच्या बंगल्याशेजारी बेवारस मादी श्वानाने सात पिलांना जन्म दिला. मादीला पुरेसे अन्न मिळत नसल्याने ती कुपोषित झाली, तर तिच्या पिलांनावरही उपासमारीची पाळी आली आहे. वसाच्या पदाधिकाऱ्यांनी या आठ प्राण्यांंची जबाबदारी स्वीकारली असून, अन्न पुरविण्याचे काम ते करीत आहेत.
संसर्गजन्य रोगांचा माणसांनाही धोका
'डर्माटिटीस व स्कॅबिट हे श्वानांना उद्भवणारे त्वचारोग आहेत. भटक्या श्वानांच्या संपर्कात आलेल्या मानवालाही या रोगांचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांना गोड, तिखट, खारट अन्नपदार्थ देऊ नका, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी अनिल कळमकर यांनी केले आहे.
परिसर बदलल्याने सर्वाधिक मृत्यू
महापालिकेचे पथक श्वानांना पकडून निर्बीजीकरण करतात आणि त्यांना दूरच्या परिसरात नेऊन सोडतात. मात्र, परिसर बदलला की, जगण्याचा संघर्ष नव्याने सुरू होतो. भांडणात किंवा पलायन करताना अपघातात मुत्युमुखी पडतात. अशाप्रकारे श्वानांच्या मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचे निरीक्षण वसाचे आहे.
श्वानांसाठी ते देवदूतच
वसा सस्थेचे पदाधिकारी जखमी व आजारी श्वानांसाठी देवदूतच आहेत. वसाचे शुभम सायंके, सुमीत देशपांडे, भूषण सायंके, रोहित रेवाळकर, राहुल सुखदेवे, तुषार वानखडे, गणेश अकर्ते हे संकटग्रस्त श्वानांच्या मदतीसाठी धावून जातात. आजपर्यंत त्यांनी हजारांवर श्वानांच्या उपचारासाठी धडपड केली आहे. श्वानांची संख्या वाढल्याने खायला पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे कुपोषणाचे बळी ठरत आहेत. अशा श्वानांसाठी वसाचे पदाधिकारी देवदूतच ठरले आहेत.

श्वानांची वेळोवेळी तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे.
- अनिल कळमकर, पशुधन विकास अधिकारी.

निर्बीजीकरण शस्त्रक्रिया फसल्याने संख्या वाढली आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने श्वान कुपोषित होत आहेत.
- शुभम सायंके, वसा

Web Title: Breeding of the swine, breeding really happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.