ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:13 IST2025-03-21T14:12:17+5:302025-03-21T14:13:39+5:30
प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका : महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळांसाठी केली निधीची मागणी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Brahmanwada Thadi Mandal excluded from heavy rain relief
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना २३ सप्टेंबर २०२४ शासन निर्णयानुसार आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करणे गरजेचे होते. मात्र, तालुक्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असताना दोनच महसूल मंडळांसाठी निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली. ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला वगळल्याने त्याचा फटका अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.
तालुक्यातील सात मंडळांपैकी जुलै व ऑगस्ट महिन्यांत करजगाव, तळेगाव मोहना व ब्राह्मणवाडा थडी या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यापैकी करजगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पीक नुकसानासाठी मदत निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली आहे. करजगाव मंडळातील २७९८ शेतकऱ्यांच्या, २१४७ हेक्टरच्या पीक नुकसानासाठी २ कोटी ९१ लाख ८५ लाख ८७२ रुपये, तर तळेगाव मोहना मंडळातील ५२७६ शेतकऱ्यांच्या ४७१५.९२ हेक्टरसाठी ६ कोटी ४१ लाख ३६ हजार ५१२ रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
प्रशासनाला ब्राम्हणवाडा शेतकऱ्यांचा विसर
ब्राह्मणवाडा थडी मंडळात तीन वेळच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकनिहाय झालेले नुकसान याचे पाहणी सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य महसूल व कृषी विभागाने दाखविले नाही. तालुक्यातील दोन मंडळांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा निधी मागणारे प्रशासन ब्राह्मणवाडा थडी मंडळातील शेतकऱ्यांना मात्र सपशेल विसरले. ७४०० ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळल्याने त्याचा फटका मंडळातील अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.
"तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झाली असावी. ब्राह्मणवाडा थडी मंडळातील अतिवृष्टीच्या पीक नुकसानीची माहिती घेण्यात येईल. विशेष बाबअंतर्गत निधीची मागणी करून मदत देण्यात येईल."
- रामदास शेळके, तहसीलदार, चांदूर बा.
"ब्राह्मणवाडा थडी मंडळात नुकसानाचे सर्वेक्षणच झाले नाही. स्थानिक महसूल व कृषी प्रशासनाच्या अक्षम्य चुकीबद्दल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळवून द्यावी."
- वामन ईसळ शेतकरी, गणोजा
"अतिवृष्टी मदतीची मागणी करून मदत देण्यात आली नाही. तीनही मंडळातील शेतकऱ्यांना, अतिवृष्टीची मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."
- गोपाल भालेराव, अध्यक्ष, लोक विकास संघटना