प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीची बसस्थानकात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 17:56 IST2022-04-14T17:52:59+5:302022-04-14T17:56:19+5:30
त्याने लग्नास नकार दिल्याने ती हतबल झाली. तिला मानसिक त्रास झाला व त्या त्रासापोटीच तिने टोकाचे पाऊल उचलले.

प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीची बसस्थानकात आत्महत्या
मोर्शी (अमरावती) : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहात १९ वर्षीय युवतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आत्महत्येची ही खळबळजनक घटना ७ एप्रिल रोजी दुपारी ४.३०च्या सुमारास घडली.
प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने हा आत्मघातकी निर्णय घेतल्याची तक्रार तिच्या पालकांकडून मोर्शी पोलिसात करण्यात आली. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी विकी गोलाईत (३२, रा. अंबाडा) याच्याविरुद्ध मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील एक १९ वर्षीय युवती मोर्शी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होती. ती मैत्रिणींसोबत दररोज गावावरून ये-जा करायची. तिचे विकी गोलाईत नामक महाविद्यालयीन युवकासोबत एका वर्षापासून प्रेमसंबंध जुळले. परस्पर संमतीने ते ७ एप्रिल रोजी नोंदणी विवाह करणार होते. मात्र, नेमक्या त्याच दिवशी प्रियकर विकी याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ती खिन्न झाली. प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत ती मोर्शी बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहात पोहोचली. तेथे सोबत आणलेली उंदीर मारण्याची पूड तिने प्राशन केली.
खूप वेळ झाल्यानंतरही ती बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच तेथील महिला, मुलींची मदत घेऊन तिला तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती उपचारास प्रतिसाद देत नसल्याने व तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अमरावतीला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. विकी गोलाईत याने लग्नास नकार दिल्याने ती हतबल झाली. त्याने धोका दिल्याने तिला मानसिक त्रास झाला व त्या त्रासापोटीच तिने आत्महत्या केली, अशी तक्रार तिच्या पित्याने १३ एप्रिल रोजी दुपारी नोंदविली.