बोलेरोला अपघात, २० जखमी
By Admin | Updated: December 6, 2014 00:46 IST2014-12-06T00:46:19+5:302014-12-06T00:46:19+5:30
आदिवासी मजुरांना कामावर अवैधरीत्या वाहनात डांबून घेऊन जाताना बोलेरो पीकअप व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला.

बोलेरोला अपघात, २० जखमी
चिखलदरा : आदिवासी मजुरांना कामावर अवैधरीत्या वाहनात डांबून घेऊन जाताना बोलेरो पीकअप व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सोमखेडा येथून २० पेक्षा अधिक आदिवासी मजूर गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान गौलखेडा बाजारनजीक हा अपघात झाला. गंभीर जखमींवर परतवाडा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून काहींना कुटीर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गौलखेडा बाजार, सोमवार खेडा, नागापूर वडापाटी परिसरातील मजूर पथ्रोट, परसापूर येथे शेतमजुरीच्या कामावर जात होते.
बोलेरो पीक-अप एम.एच.३० ३४७६ मध्ये कोंबून जात होते. तर मोठ्या प्रमाणात वाहनाबाहेर काही मजूर लोंबकून उभे होते.
पहाटे वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे काही मजुरांनी सांगितले. यात सोमवार खेडा येथील गीता ठाकरे (२२), विमल राजू ठाकरे (२०), शालिकराम मोतीलाल भुसूम (२१), जुगल रतनलाल काळे (२५), तुली शालीकराम भुसूम (३५), शामू गाणू बेलसरे (१७), सचिन लालमन ठाकरे (२५), रामू सुदाम भास्कर (१५), अलय लालजी ठाकरे (३४), विलास तोटे (१५), पूर्णा भूसूम आदी यात गंभीर जखमी झालते. गाडीचा चालक अपघात होताच फरार झाल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळ परतवाडानजीक असून चिखलदरा पोलीस ठाण्याअंतर्गत येते. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)