कामगारांच्या नावांवर ‘ब्लॅकमनी’
By Admin | Updated: November 19, 2016 00:07 IST2016-11-19T00:07:35+5:302016-11-19T00:07:35+5:30
देशातील काळा पैसा बाद करण्यासाठी केंद्र सरकारने गत आठवड्यात पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कामगारांच्या नावांवर ‘ब्लॅकमनी’
व्यावसायिकांचा नवा फंडा : चार ते पाच महिन्यांचे वेतनही जमा
अमरावती : देशातील काळा पैसा बाद करण्यासाठी केंद्र सरकारने गत आठवड्यात पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यानिर्णयानंतर काही व्यावसायिक, उद्योजकांनी ‘ब्लॅकमनी’ ‘व्हाईट’ करण्यासाठी चक्क कामगारांच्या नावे लाखो रूपये जमा करण्याचा नवा फंडा वापरला आहे. शहरानजीकच्या नागपूर महामार्गावरील नामांकित कापडविक्री संकुलातील कामगारांच्या नावे ‘ब्लॅकमनी’ टाकल्याची माहिती आहे.
हजार-पाचशे रुपयांचे चलन बाद करण्याचा निर्णय होताच औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात भूकंप आल्याचे चित्र आठवडाभरापासून दिसत आहे. नांदगाव पेठ आणि गोपालनगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत कार्यरत कामगारांना त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार ते एक लाख रुपये ‘ब्लॅकमनी’ देऊन तेच पैसे ‘व्हाईट’ करण्याची शक्कल लढविली आहे. अनेक उद्योजकांकडे कार्यरत कामगारांना बँकेतून वेतन दिले जात असताना आॅक्टोबर महिन्यातील वेतन रोखीने देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. नागपूर महामार्गालत रेडिमेड कापड व्यवसायात विदर्भात सर्वदूर नावाजलेल्या संकुलात प्रतिष्ठानच्या मालकांकडून कामगारांना पाच ते सहा महिन्यांचे अग्रीम वेतनही देण्यात आले आहे. दरवेळी बँकेत वेतन जमा होत असताना यावेळी चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा कामगारांच्या हाती सोपविल्या आहेत. कामगारांनी सुद्धा नाईलाजास्तव जुने चलन वेतनापोटी स्वीकारले आहे. गत आठवड्यात कामगारांच्या वेतनाच्या नावावर व्यावसायिक, उद्योजकांनी कोट्यवधीचा ‘ब्लॅकमनी’ ’व्हाईट’ केला आहे. कामगारांच्या व्यथा आणि परिस्थितीचा लाभ घेऊन कामगारांमार्फत ‘काळा पैसा पांढरा’ करणारे उद्योजक, व्यावसायिकांवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. अशा एक ना अनेक मार्गांनी ब्लॅक मनीची विल्हेवाट लावली जात आहे. काळ्या पैशाला पांढरा करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. त्यातल्या त्यात अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पैसा सुरक्षित ठेवण्याची पद्धत जरा अधिकच प्रचलित झाली आहे.
बँकेच्या रांगेत रोजंदारी मजूर
पैसे मिळविण्यासाठी बँक, एटीएम, टपाल खात्यात नागरिकांची झुंबड आजही कायम आहे. मात्र, पैसे मिळविण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे असणाऱ्यांंमध्ये काही रोजंदारांंचाही भरणा आहे. ‘नोटाबंदी’ मुळे बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे रिकाम्या हातांना काम मिळविण्यासाठी कामगार रांगेत उभे राहात असल्याचे चित्र आहे. पैसे काढण्यासाठी दिवसभर व्यावसायिक रांगेत उभे राहू शकत नसल्याने कामगारांना बँकेच्या रांगेत उभे करुन वेळ आणि श्रमाची बचत करीत आहेत. मात्र या प्रकारामुळे कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे, हे मात्र खरे आहे.
एमआयडीसीत कामगारांच्या खात्यात अग्रीम रक्कम
केंद्र सरकारने पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक गोपालनगर परिसरातील एमआयडीसीत काही उद्योजकांनी कामगारांच्या बँक खात्यात (करंट) मोठी रक्कम अग्रीम राशी म्हणून जमा केली. त्यानंतर दोन ते तीन कामगारांच्या खात्यातून जुने चलन बदलवून नवे चलन मिळविल्याची माहिती आहे. एका मोठ्या उद्योजकांनी चक्क ३०० कामगारांच्या नावे अग्रीम राशी दिल्याची माहिती एका कामगाराने दिली.