खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?; चंद्रशेखर बानकुळेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:50 IST2024-03-04T12:50:43+5:302024-03-04T12:50:52+5:30
नवनीत राणा यांचा लवकरच नागपुरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?; चंद्रशेखर बानकुळेंनी स्पष्टच सांगितलं!
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या. भाजपा-शिवसेना युती असताना, मोदींच्या लाटेतही नवनीत राणांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत अमरावतीची निवडणूक जिंकली. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु याचदरम्यान नवनीत राणा भाजपात प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नवनीत राणा यांचा लवकरच नागपुरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज नागपूरात नमो युवा संमेलन आहे. नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. नवनीत राणा आणि भाजपाच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावले आहे. नवनीत राणा यांना सुद्धा संमेलनाचा निमंत्रण दिले आहे इथे कोणताही पक्षप्रवेश नाही सहयोगी म्हणून ते येतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी आज नागपूरात माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, नवनीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार बनून निवडणूक जिंकली असली तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले आहे. राज्यातील भाजपा नेत्यांच्या बाजुनेच त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील लढाईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्राही घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, भाजपकडून त्यांना यंदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच, राणा दाम्पत्याने मोदी सरकारच्या कामाचे अनेकदा कौतुक केले आहे. तर, उघडपणे भाजपाचे समर्थनही केल्यांच दिसून आलं. त्यामुळे, यंदा भाजपाच्या तिकीटावर त्यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आम्ही एनडीएबरोबर आहोतच- नवनीत राणा
आम्ही एनडीएबरोबर आहोतच, त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखे नाही. नमो युवा संमेलन आहे. एनडीएचे घटक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत? काय बोलत आहेत? यामध्ये पडणार नाही. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही. आम्ही गरिबांसाठी काम करतो आणि तेच करत राहणार, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.