लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी अमरावती शहरात महायुतीच्या घटक पक्षात समन्वय नाही, हे येथील नेहरू मैदानाच्या विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने रविवारी समोर आले. भाजपने नेहरू मैदानात महापालिकेची इमारत होऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांना थेट विरोध केला आहे. तसेच शहरातील मैदाने वाचविण्याची कृती समिती स्थापन करणार असल्याचे भाजपने पत्रपरिषदेतून स्पष्ट केले. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली असताना काँग्रेसचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आमदार दाम्पत्यांची कृती ही शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उद्ध्वस्त करणारी असल्याची घणाघाती टीका केली आहे. परिणामी, आता नेहरू मैदानाच्या जागेवरून रणकंदन सुरू झाले असताना पुढे कोणते 'राज'कारण होते, हे लवकरच कळणार आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या नेहरू मैदानात महानगरपालिका प्रशासनाची नवी इमारत बांधण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. अशातच आता मैदान वाचविण्यासाठी भाजप समोर आला आहे. नेहरू मैदान हे ऐतिहासिक मैदान असून, येथे इमारत होऊ देणार नसल्याचे रविवारी पत्र परिषदेत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात आधीच कमी मैदाने आहेत, त्यामुळे शहरातील सर्व मैदाने वाचविण्याची गरज असल्याची भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली. यावेळी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी महापौर किरण महल्ले, किरण पातूरकर, दिनेश सूर्यवंशी देखील उपस्थित होते. शहरातील नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याच मैदानात अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या ऐतिहासिक मैदानासह शहरातील इतर कोणत्याही मैदानावर कोणत्याही प्रकारची वास्तू उभी राहणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. हे मैदान वाचविण्यासाठी मैदान बचाव व संवर्धन कृती समिती स्थापन केल्याचेही डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले. राजकमल चौकातून इमारत हटवून ती पुन्हा गजबजलेल्या भागातच नेण्याची कल्पना हास्यास्पद आहे. विद्यापीठ मार्गावर जागा उपलब्ध असताना नेहरू मैदानाचा बळी घेणे योग्य नाही. या निर्णयाला आमचा प्रखर विरोध असून, गरज पडल्यास आम्ही जनआंदोलन उभारू, असेही पत्र परिषदेतून भाजपने स्पष्ट केले.
अमरावतीकरांचे भावनिक नाते
या मैदानाचे सौंदर्गीकरण व्हावे. इथे असलेली शाळेची इमारत 'हेरिटेज' आहे. शहराच्या मध्यभागी छोटे का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे. त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे.
Web Summary : Amravati BJP opposes building on Nehru Maidan, clashing with alliance partners. They vow to protect city grounds, forming a committee amidst political tensions and emotional ties.
Web Summary : अमरावती भाजपा ने नेहरू मैदान पर निर्माण का विरोध किया, गठबंधन सहयोगियों से टकराव। उन्होंने राजनीतिक तनाव और भावनात्मक संबंधों के बीच एक समिति बनाकर शहर के मैदानों की रक्षा करने का संकल्प लिया।