अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड यशोमती ठाकूर; भाजप नेत्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 14:40 IST2022-04-19T14:27:27+5:302022-04-19T14:40:26+5:30
अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे, परंतु, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हणाले.

अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड यशोमती ठाकूर; भाजप नेत्याचा आरोप
अमरावती : अचलपूर येथे झेंड्यावरून दोन गटात उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान दगडफेक व हाणामारीत झाले. या घटनेमागे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे.
आज (दि. १९) अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने अमरावतीत निदर्शने करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे यांनी हा दावा केला. अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे, परंतु, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हणाले.
अचलपूर घटनेसह अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबरला झालेली दंगल, त्यानंतर मातंग समाजाच्या मुलांनी काश्मीर फाईल बघिल्यानंतर भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांच्यावर झालेला हल्ला, वनगावमध्ये एका तरुणावर झालेला हल्ला हे सर्व या सर्व प्रकरणांमागे यशोमती ठाकूर यांचा हात असल्याचे बोंडे म्हणाले. यासह त्या रेती, गुटखा, भंगार, मटक्यासारख्या अवैध धंद्यांना संरक्षण देण्याचं काम करत असल्यामुळे हिम्मत वाढली आहे. आणि म्हणून अमरावती जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या दंगलीला एकमेव काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचा आरोप बोंडे यांनी केला.
काय आहे प्रकरण?
अचलपूर शहरातील दुल्ल गेट परिसरात अचलपूरात काल झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये राडा झाला. एका गटाने हा झेंडा लावला तर पूर्वी तेथे झेंडा नसल्याने दुसऱ्या समाजाने याला विरोध दर्शविला व तो झेंडा काढला. त्यावरून काही युवक तोंडाला दुपट्टा बांधून तेथे आले. दरम्यान अचानक त्याचवेळेस नमाज सुटल्याने मोठा जमाव एकमेकांकडे पुढे धडकला. अचलपूर, परतवाडा, सरमसपुरा येथील पोलीस अधिकारी व मोजक्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे गंभीर स्थिती मोठ्या शिताफीने हाताळली. या प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. तर, काही जण अद्याप फरार आहेत.