आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान

By Admin | Updated: January 3, 2017 00:11 IST2017-01-03T00:11:35+5:302017-01-03T00:11:35+5:30

राज्यात सन २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत.

Biliraja Chetna campaign to prevent suicides | आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान

आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान

जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाला प्रस्ताव : शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यावर भर
गजानन मोहोड अमरावती
राज्यात सन २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. सलग दुष्काळ, नापिकी व उत्पादन खर्च अधिक तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे वाढत्या कर्जामुळे नैराश्य येऊन शेतकरी मृत्यू जवळ करीत आहेत. या पार्श्वभूमिवर त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शासनाकडे पाठविला आहे.
नैराश्यग्रस्ततेमुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. याशेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी शासनाने २५ जून २०१५ रोजी बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात विदर्भातील यवतमाळ व मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट आली. मात्र, सन २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक ३४० आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा अशी जिल्ह्याची दुर्देवी ख्याती आहे. यागर्तेमधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आता ‘बळीराजा चेतना अभियाना‘चा आधार घेतला जाणार आहे. या अभियानात त्रस्त शेतकरी कुटूंब ओळखण्यासाठी ग्रामस्तरिय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी बनविण्यात येणार आहे.

लोकसहभागातून पेरणीला प्रोत्साहन
अमरावती : प्रेरणादायी व्याख्यान, पथनाट्य, कीर्तन, नाटक इत्यादी उपक्रम विशिष्ट कालावधीत राबविण्यात येतील. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार व लढाऊ वृत्ती वाढविण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाईल. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त शेतकऱ्यांना लोकसहभागातून पेरणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल. जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत योग्य कालावधीत गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. याशिबिरात मानसोपचारतज्ज्ञ व समाजसेवकांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यांसह अन्य उपक्रम राबविण्यात येतील. आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी व आत्महत्या राखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान जिल्ह्यात राबविणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केले आहे. हेअभियान अमरावती जिल्ह्यासाठी प्रस्तावित करण्यात यावे व त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

अभियानाची वैशिष्ट्ये
क्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे तसेच त्यांच्यामध्ये जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे.
सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदींबाबत भजन, कीर्तन, पथनाट्य यामाध्यमातून सर्व गावांमध्ये माहिती देण्याचा उपक्रम राबविणे, त्रस्त कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे समुपदेशन करणे.
शेतीविषयक शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीविषयक माहिती सर्व गावांमध्ये देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमीतकमी खर्चात व अल्प प्रमाणात पाणी वापरून अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयी-सवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करून त्यांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देणे.
सहकारी सोसायटींचा सदस्य होण्यास प्रत्येक शेतकऱ्याला प्रवृत्त करण्यासाठी सभासद मोहीम राबविणे, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी करमणुकीचे कार्यक्रम राबविणे व यामध्ये शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.

शेतकरी स्वावलंबन मिशनची बुधवारी बैठक
जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूूमिवर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची बैठक ४ जानेवारीला होणार आहे. शेतकऱ्यांशी संबंधित ३४ विभागांचा आढावा यावेळी घेण्यात येईल. रबी पेरणी, धान्याची शासकीय खरेदी, आदिवासी, आरोग्य, नागरीपुरवठा, मुद्रा, पीककर्ज, कृषी सोलरपंप, धडक सिंचन विहीर, बाजार समिती, सिंचन प्रकल्प, आदी १८ विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणेची अपेक्षा आहे.

Web Title: Biliraja Chetna campaign to prevent suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.