नातेवाईकांना लाभ, १.२० कोटींचा घोटाळा? लहाळेंवर गंभीर आरोपांची मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:26 IST2025-06-21T13:25:13+5:302025-06-21T13:26:09+5:30
Nagpur : ४० दिवसांवर सेवानिवृत्ती, पण भ्रष्टाचार प्रकरणांमुळे लहाळेंच्या अडचणीत भर

Benefiting relatives, a scam of Rs 1.20 crore? Series of serious allegations against Lahale
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) प्रमोद लहाळे यांच्या अनियमित व भ्रष्ट कारभारासंदर्भात लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर शासन हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी कृषी आयुक्त तसेच प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत प्रधान सचिवांनी २४ तासांत सविस्तर अहवाल मागवला आहे.
या चौकशीसाठी कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी अकोल्याच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंकुश माने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, १५ दिवसांत मुद्देसूद अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रमोद लहाळे यांनी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना नातेवाइकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, वर्ग-४ पेपरफूट प्रकरणातील सहभाग, निवडणूक आयुक्तांचे आदेश डावलून बदल्या करणे, १.२० कोटींचा किट खरेदीत भ्रष्टाचार, वसुलीच्या बदल्या आदी गंभीर आरोप आमदार धस यांच्या तक्रारीत नमूद आहेत. लहाळे यांच्या सेवानिवृत्तीस अवघे ४० दिवस उरले.
काय आहेत चौकशीचे आदेश?
राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी विशाल टेके यांनी १९ जून रोजी कृषी आयुक्त पुणे यांना पत्र पाठवून, लहाळे यांच्यावरील आरोपांची सविस्तर वस्तुस्थिती व प्रस्ताव २० जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात प्रधान सचिव (कृषी) यांच्या स्पष्ट सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. असताना चौकशीच्या हालचालींमुळे त्यांची अडचण वाढली आहे. दरम्यान, ते दोन दिवसांपासून मुंबई-पुणे दौऱ्यावर असल्याचे समजते.