सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट
By Admin | Updated: May 18, 2016 00:07 IST2016-05-18T00:07:50+5:302016-05-18T00:07:50+5:30
येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट
अमरावती : येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षता घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. उष्माघातामुळे होणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले आहे.
काय करावे
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा जणेकरुन आज उष्णतामान किती आहे, याची माहिती मिळेल.भरपूर पाणी प्यावे, हलक्या पातळ व सछिद्र कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेल लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. चक्कर येत असेल तर त२त्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओल्या कपड्यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. अधिकाधिक कामे सकाळीच करुन घ्यावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी.
काय करु नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद ठिकाणी किंवा पार्क केलेल्या वाहनात कधीच ठेऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत तसेच बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे करण्याचे टाळावे. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, मद्य व काबोर्नेटेड थंडपेय यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या गोष्टी पिण्याचे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे. उष्णतेची लाट शरीराला फार हानिकारक आहे. उपरोक्त उपाययोजनांमुळे उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो.