अवकाळीने २१०० हेक्टरला फटका; गहू, हरभरा, कांद्यासह फळबागांचे नुकसान
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 19, 2023 16:40 IST2023-03-19T16:37:21+5:302023-03-19T16:40:30+5:30
त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे.

अवकाळीने २१०० हेक्टरला फटका; गहू, हरभरा, कांद्यासह फळबागांचे नुकसान
अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून विजांसह वादळ, गारपीट अन् अवकाळी पावसाने २,०५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक १,४९८ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे कर्मचारी संपात असल्याने महसूल यंत्रणेद्वारा नुकसानीचा नजरअंदाज पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात ६२ हेक्टरमधील गहू, चणा व संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे.
चिखलदरा तालुक्यात पाऊस व गारपिटीने ४७० हेक्टरमधील गव्हाचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १९.५० हेक्टरमधील गहू व कांदा तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४९८ हेक्टरमधील कांदा, संत्रा, टरबूज व हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
जिल्ह्यात अवकाळी पावसाला १६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस, म्हणजेच २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, रविवारी ढगाळ वातावरण कमी झाले व दिवसभर उघडीप होती.