डोळ्यांत मिरचीपूड फेकून १९.५० लाख लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:54+5:30
गुरुवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मनोज यांनी मालवीय चौकाजवळील गुलशन मार्केट स्थित यस बँकेतून १९ लाख ५० हजार रुपये बॅगेत भरले. बॅग पाठीवर घेऊन ते दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेकडे निघाले होते. परंतु, घटनास्थळी दोन तरुणांनी मनोजला थांबविण्याचा प्रयत्न केला. एका लुटारूने मनोजच्या डोळ्यात मिरचीपुड फेकली आणि दुसऱ्याने धक्का देऊन त्यांना दुचाकीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला.

डोळ्यांत मिरचीपूड फेकून १९.५० लाख लुटण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मिरचीपूड डोळ्यात फेकल्यानंतर चाकूने मारून एका तरुणाजवळील १९ लाख ५० हजारांची रोख लुटून नेण्याचा प्रयत्न झाला. या लुटमारीला विरोध केल्याने आरोपींनी झटापट करून पळ काढला. मनोज प्रताप चौधरी (३५ रा. मराठा विहार, गोपालनगर) असे जखमीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी भर दिवसात कोतवाली हद्दीतील खादीम शोरूमसमोर घडली.
मनोज चौधरी हे एका कंपनीत कार्यरत असून, विविध बँकांतील रोख रक्कम घेऊन ती रक्कम स्टेट बँकेत भरण्याचे काम करतात. गुरुवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मनोज यांनी मालवीय चौकाजवळील गुलशन मार्केट स्थित यस बँकेतून १९ लाख ५० हजार रुपये बॅगेत भरले. बॅग पाठीवर घेऊन ते दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेकडे निघाले होते. परंतु, घटनास्थळी दोन तरुणांनी मनोजला थांबविण्याचा प्रयत्न केला. एका लुटारूने मनोजच्या डोळ्यात मिरचीपुड फेकली आणि दुसऱ्याने धक्का देऊन त्यांना दुचाकीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. लुटारू बॅग हिसकाविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे पाहून मनोज यांनी दोन्ही लुटारूंना विरोध केला. त्यावेळी लुटारुंपैकी एकाने मनोजच्या पाठीवर चाकूने वार केला. यावेळी झटापट झाल्यानंतर लुटारुंनी तेथून पळ काढला. मनोज चौधरी घटनेची तक्रार कोतवाली ठाण्यात पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३९४, ३४१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज
तीन भामट्यांनी चाकूने वार करून तसेच मिरचीपूड तोंडावर फेकून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी येस बँक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याची माहिती आहे. पोलिसांची पथक आरोपीच्या मागावर आहे.