हल्लेखोरांचा सत्कार-माजी सैनिकाला मात्र लाथा बुक्क्यांचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 20:14 IST2020-09-13T20:14:08+5:302020-09-13T20:14:29+5:30
माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही, हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

हल्लेखोरांचा सत्कार-माजी सैनिकाला मात्र लाथा बुक्क्यांचा मार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही, हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
यासंदर्भात आपण लोकसभेत आवाज उठवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना प्रत्यक्ष भेटून कैफियत मांडणार व न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. तसेच देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थही बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना मदन शर्मा यांच्याबाबत अवाक्षर काढले नाही. तसेच खासदार संजय राऊत यांनी त्याचे समर्थन केले. हा हल्ला सर्व माजी सैनिकांवरचा हल्ला होता. त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न होता असे राणा पुढे म्हणाल्या.
माजी सैनिक या देशाची शान आहे-राष्ट्राचा स्वाभिमान आहे एक खासदार म्हणून आपण त्यांच्याप्रती कायम आदर बाळगून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे सांगून या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. देशातील जनतेने ठामपणे माजी सैनिकांचे पाठीशी उभे राहावे व महाराष्ट्रात अराजकता माजली आहे त्यासाठी तमाम महाराष्ट्र वासीयांनी सुद्धा या अन्यायाविरुद्ध एक व्हावे असे आवाहन खासदार नवनीत रवी राणा यांनी केले आहे