प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच दिवसांपूर्वी फरशी स्टॉपस्थित एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. तर, २५ एप्रिल रोजी राजकमल अंबादेवी रोडस्थित आयडीबीआयचे एटीएम फोडण्यात आले. विशेष म्हणजे ते एटीएम चक्क तिसऱ्यांदा लक्ष्य करण्यात आले. एकाच आठवड्यात झालेल्या दोन घटनांमुळे एटीएमची सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही घटनेत चोरांना कॅश ट्रे लांबविता आला नसला, तरी त्यांनी त्या एटीएमचे मोठे नुकसान केले आहे. त्या दोन्ही एटीएममध्ये रात्रीचा सुरक्षारक्षक नव्हता.
त्या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने ७ मे रोजी शहरातील काही एटीएमचा धांडोळा घेतला असता, केवळ दोन खासगी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक आढळून आले, तर अन्य १३ एटीएममध्ये सुरक्षारक्षक आढळला नाही. त्या सर्व एटीएम केंद्रात अस्वच्छता आढळून आली. सुरक्षारक्षक नसलेले ते एटीएम चोरांसाठी आयती संधी असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. शहरात विविध बँकांचे सुमारे १६० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र, ९५ टक्के एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाहीत, अनेक ठिकाणी सायरन सिस्टिम नाहीत.
केवळ दोन एटीएममध्ये सुरक्षारक्षकजयस्तंभ चौक मार्गावरील सिटी युनियन बँक व त्याच मार्गावरील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक आत बसलेले आढळून आले. आपली ड्युटी रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. ते दोन एटीएम स्वच्छदेखील आढळले.
'लोकमत'ने काय पाहिलेजयस्तंभ चौक मार्गावरील तीन, सामरा सिल्कजवळील एक, श्याम चौकातील तीन, गांधी चौकातील दोन, राजापेठच्या श्रीराम मंदिर भागातील एक, कंवरनगर रस्त्यावरील दोन, कल्याणनगर ते मोतीनगर रस्त्यावरील दोन व अर्जुननगरातील एक अशा १५ एटीएमची ७ मे रोजी रात्री पाहणी केली. दोन एटीएममध्ये सुरक्षारक्षक आढळले.
आयडीबीआय झोपेतच, सुरक्षारक्षक नाहीचअंबादेवी रोडवरील एका व्यावसायिक संकुलात पहिल्या माळ्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम गेल्या दीड वर्षात आतापर्यंत तब्बल तीनदा फोडले. १७ जानेवारी २०२४ रोजी ते एटीएम फोडण्यात आले. मात्र, १६ लाख रुपये असलेला ट्रे सुरक्षित राहिला. त्यानंतर २ सप्टेंबर २०२४ व २५ एप्रिल २०२५ रोजी देखील ते एटीएम फोडण्यात आले. मात्र, त्या एटीएममधील कॅश चोरण्यात चोर यशस्वी होऊ शकले नाहीत. तब्बल तीनदा एटीएम फोडल्यानंतरही आयडीबीआय बँकेला रात्रीचा सुरक्षारक्षक ठेवण्याचा मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे बँकेला मोठी रक्कम चोरीला जाण्याची प्रतीक्षा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशी आहेत एटीएमची मानके, अंमल नाहीचएटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी, याची मानके आरबीआयने ठरवून दिलेली आहे. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये सायरन, एटीएमच्या बाहेर फ्लॅश लाइट, फक्त रेकॉर्डिंगच्या उद्देशाने कॅमेरे न बसविता आतील आणि बाहेरील अशा दोन्ही भागांचे चित्रीकरण करणारे कॅमेरे असावेत. स्वयंचलित लॉक होणारे दरवाजे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक या मानकांचा समावेश आहे. अनेकदा बँकांचे एटीएम निर्जन स्थळी किंवा रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे एटीएमला सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे.