महिलेकडून हल्ला; महिला सहायक पोलीस निरीक्षकाचा गळा आवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 10:59 AM2022-05-23T10:59:11+5:302022-05-23T11:01:09+5:30

आरोपींनी कोठावार यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यातील एका महिला आरोपीने कोठावार यांचा गळा दाबला, तथा नखाने ओरबाडून त्यांना जखमी केले, तर दुसऱ्या महिलेने थापडांनी मारले.

Assault by a woman; A female assistant police inspector was strangled | महिलेकडून हल्ला; महिला सहायक पोलीस निरीक्षकाचा गळा आवळला

महिलेकडून हल्ला; महिला सहायक पोलीस निरीक्षकाचा गळा आवळला

Next
ठळक मुद्देराजापेठ पोलीस ठाण्यातील घटना : दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : लुटमारीच्या प्रकरणात अटक करण्यासाठी आणलेल्या चार आरोपींनी चक्क महिला सहायक पोलीस निरीक्षकांवरच हल्ला चढविला. एका महिला आरोपीने त्या पोलीस अधिकाऱ्याचा गळा दाबला. तथा गळ्यावर नखाने ओरबडून जखमी केले.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या आवारातील बहुउद्देशीय हॉलमध्ये २१ मे रोजी दुपारी १च्या सुमारास हा थरार घडला. या प्रकरणी सायंकाळी ७च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी बाबू उर्फ योगेश चुडे, तेजस चुडे व दोन महिला (सर्व रा.विजयनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात बाबू चुडे व एका महिलेला अटक करण्यात आली.

राजापेठ पोलीस ठाण्यातील एक महिला सहायक पोलीस निरीक्षकांनी विजयनगर येथील बाबू चुडे, तेजस चुडे व दोन महिलांना तपासकामी राजापेठ पोलीस ठाण्यात बोलावले होते. २१ मे रोजी दुपारी १च्या सुमारास स्वत:चा परिचय देऊन तुम्हाला अटक करण्यात येत असल्याने, तुम्ही पोलीस ठाण्यातच थांबा, असे महिला एपीआयने त्या चौघांना बजावले. त्यावर शिवीगाळ करत, आम्ही थांबत नाही, तुम्हाला काय करायचे आहे, ते करून घ्या, असे उलट बोलून आरोपींनी कोठावार यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यातील एका महिला आरोपीने कोठावार यांचा गळा दाबला, तथा नखाने ओरबाडून त्यांना जखमी केले, तर दुसऱ्या महिलेने थापडांनी मारले. तेजसने पकडून ठेवत आरोपी बाबू चुडे याने महिला पोलीस अधिकाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या तावडीतून महिला एपीआयला सोडविले. बाबू चुडेसह महिला एपीआयचा गळा दाबणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.

बाहेर भेट, मर्डर करतो!

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर महिला एपीआयला उद्देशून तू बाहेर भेट, तुला कापून तुझा मर्डर करतो, अशी धमकी चुडे पितापुत्राने दिली, तर बाबू चुडे याने स्वत:जवळील दुपट्टा गळ्याभोवती आवळत आत्महत्या करून फसविण्याची धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा आणून आरोपींनी गळा दाबला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तथा फसविण्याची, जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्या सहायक पोलीस निरीक्षक महिलेने नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन करीत आहेत.

बाबू चुडेविरुद्ध अवैध दारू विक्रीबाबत १६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तपासकामादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक महिलेचा गळा दाबण्यात आला. मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

- मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ.

Web Title: Assault by a woman; A female assistant police inspector was strangled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.