बडनेरा रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. रविवारी सकाळी लोकांना तो दिसला. मृतदेह दगडाने ठेचलेला होता. हत्या करण्यात आल्याचे डोक्याला लागलेल्या जबर मारावरून दिसत होते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा दोन तासातच उलगडा केला. या प्रकरणात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जो मृतदेह मिळाला, तो कुणाल विनोद तेलमोरे (वय १९, रा. माताफैल, जुनीवस्ती) या तरुणाचा आहे. त्याची हत्या करण्यात आली.
बाहेर गेला, तो परत आलाच नाही
कुणाल शनिवारी रात्री १० च्या सुमारास वडिलांची दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. तो परत आला नाही. घरच्यांनी त्याला कॉल केले. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. त्यानंतर मध्यरात्री कुणालच्या आई-वडिलांनी ठाण्यात धाव घेतली.
कुणालचा मृतदेह सापडला झुडूपात
दरम्यान, लोको शेडच्या रस्त्यावर दुचाकी उभी होती. साईड ग्लास तुटलेला होता. त्यापासून शंभर फुटांवर झुडपात मृतदेह होता. बडनेरा पोलिसांसमवेत फॉरेन्सिक टीम, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ दाखल झाले. वडील विनोद तेलमोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या तीन पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व फोन कॉल डिटेलच्या आधारे दीपेश लक्ष्मण समुद्रे (२१, रा. तिलकनगर, बडनेरा) व पीयूष किशोर भोयर (१९) यांना अटक केली, तर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
दीपेशसोबत वाद, पीयूषवर केला होता चाकू हल्ला
पोलिसांनी केलेल्या तपासातून कुणालच्या हत्येचे कारणही समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत कुणाल तेलमोरे याची पवारवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळताना पाच महिन्यांपूर्वी दीपेशसोबत हाणामारी झाली होती.
त्यानंतर साहील लॉन येथे दीपेशवर रिसेप्शनमध्ये राघव बक्षी याने चाकू मारला होता. तो व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी कुणाल देत होता.
आठ दिवसांपूर्वी राय टाउनशिप येथे दीपेशला बोलावून कुणालने मारहाण केली होती. याशिवाय पीयूष व एक विधिसंघर्षग्रस्त बालक दीपेशसोबत का राहतात, यावरून कुणाल काही दिवसांपूर्वी या दोघांमागे चाकू उगारून धावला होता. याच कारणांमुळे आरोपींनी कुणाल संपविण्याचे ठरविले.
कुणालची हत्या कशी केली?
दीपेश व पीयूषला २७ डिसेंबर रोजी विधिसंघर्षग्रस्त बालकाने कुणाल हा दुसऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकासोबत असल्याची टीप दिली. त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला कॉल करून त्यांनी कुणालला घटनास्थळी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर चौघांनी मारहाण करून त्याला ठार केले.
Web Summary : A cricket dispute escalated into murder. Kunal Telmore, 19, was found dead near Badnera station. Four suspects, including two minors, are arrested. Previous fights and threats fueled the crime. The accused lured and killed Kunal after a tip-off.
Web Summary : क्रिकेट विवाद में हत्या हुई। 19 वर्षीय कुणाल तेलमोरे बडनेरा स्टेशन के पास मृत पाए गए। दो नाबालिगों सहित चार संदिग्ध गिरफ्तार। पहले की लड़ाई और धमकियों ने अपराध को बढ़ावा दिया। आरोपियों ने सूचना मिलने पर कुणाल को लालच देकर मार डाला।