अमरावती : राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ३१ मार्चपर्यंत सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन सभा घेण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील सहकारी संस्थांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेकांना नवीन तंत्रज्ञान अवगत नसल्याने या सभा घेताना संचालक मंडळाची चांगलीच तारांबळ उडत आहे.
पतसंस्था, नागरी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, शेती पूरक संस्था, दूध संघ आदी विविध प्रकारच्या ५० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सहकारी संस्थांना ३१ मार्चपर्यंत ऑनलार्ईन सभा घेणे बंधनकारक आहे. ही सभा कशी घ्यायची, याची नोटीस देऊन ज्या सभासदांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी संस्थेच्या कार्यालयात नाही, अशा सभासदांना घरपोच पोस्टाने सभेची विषयपत्रिका पोहोच करायची आहे.
जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विस्तृत आहे. ४०० हून अधिक संस्थांना ऑनलाइन पद्धतीने सभा घ्यायची आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या कार्यालयात धावपळ सुरू आहे. काही संस्थांनी ऑनलाइन सभेसाठी सॉफ्टवेअर पुरविणारी एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य भाग ग्रामीण क्षेत्रात मोडतो. अनेक सभासद अशिक्षित आहेत. काही स्मार्टफोन वापरणारे नाही. त्यामुळे या सभासदांना पोस्टाने सभेची विषयपत्रिका पाठवायची आहे. अशा सभासदांना ऑनलाइन सभेसाठी कसे कनेक्ट करायचे, असा प्रश्न सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना पडला आहे.
कोट
शासनाच्या ८ मार्च रोजीच्या आदेशानुसार सहकारी संस्थांना येत्या ३१ मार्चपर्यंत आमसभा घेणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधिताना सूचना दिल्या आहेत.
संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती