‘मॅनेजमेंट’मध्ये १० कोटी निधीच्या खर्चाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:39+5:30
निधी विद्यापीठाच्या घसारा निधीतनू खर्च करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळणाऱ्या १० कोटी निधीतून ही रक्कम नंतर घसारा निधीत वळती करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाने रूसा अंतर्गत २० कोटी मंजूर केले. त्यापैकी १० कोटी मिळाले असून, १० कोटी अप्राप्त आहे. मात्र, हा उर्वरित निधी मिळण्यासाठी विद्यापीठात कामांची प्रगती आवश्यक आहे. ही रूटीन प्रक्रिया असून, घसारा निधीतून १० कोटी घेतले जातील. नव्याने रूसाचे १० कोटींचा निधी येताच तो घसारा निधीत वळता केला जाईल.

‘मॅनेजमेंट’मध्ये १० कोटी निधीच्या खर्चाला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या (मॅनेजमेंट) बैठकीत भौतिक सुविधांसाठी १० कोटी रूपये निधीच्या खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. हा निधी विद्यापीठाच्या घसारा निधीतनू खर्च करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळणाऱ्या १० कोटी निधीतून ही रक्कम नंतर घसारा निधीत वळती करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत ‘मॅनेजमेंट’ सदस्यांची बैठक सोमवारी पार पडली. बैठकीला प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर, दिनेश सूर्यवंशी, एफ.सी. रघुवंशी, अनिल मोहरील, नीलेश गावंडे, प्रफुल्ल गवई, मीनल ठाकरे, अरूण चव्हाण, उत्पल टोंगो, अरूणा पाटील, लेखा व वित्त अधिकारी भारत कऱ्हाड, विद्यापीठ प्रतिनिधी डुडूल आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान- (रुसा) २.० योजना अंतर्गत विद्यापीठाला २० कोटी मंजूर झाले होते. त्यापैकी विद्यापीठाला १० कोटी रूपये ३१ जुलै २०१८ रोजी प्राप्त झाले होते. मात्र, केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाकडून एकूण निधीच्या ७५ टक्के निधी डिसेंबरपर्यत खर्चाचे उपयोजित प्रमाणपत्र सादर करण्याचे विद्यापीठाला कळविण्यात आले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळालेला १० कोटींच्या निधीतून ४,५४,८०,१०० एवढी रक्कम भौतिक सुविधांवर खर्चदेखील करण्यात आली आहे. दरम्यान रूसाचे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्राप्त १० कोटींच्या निधीतून विद्यापीठात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अवगत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मधील ३१ (जी) (पी) मधील तरतुदीनुसार रूसा निधी खर्चाला मंजुरी घेण्याबाबतचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. रूसा अंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित मंजूर १० कोटी निधी आल्यास तो घसारा निधीत टाकला जाईल, असे व्यवस्थापन परिषदेने ठरविले आहे.
केंद्र शासनाने रूसा अंतर्गत २० कोटी मंजूर केले. त्यापैकी १० कोटी मिळाले असून, १० कोटी अप्राप्त आहे. मात्र, हा उर्वरित निधी मिळण्यासाठी विद्यापीठात कामांची प्रगती आवश्यक आहे. ही रूटीन प्रक्रिया असून, घसारा निधीतून १० कोटी घेतले जातील. नव्याने रूसाचे १० कोटींचा निधी येताच तो घसारा निधीत वळता केला जाईल.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ