अनाथ बसंती, अपंग बसंतचा अविस्मरणीय विवाह सोहळा
By Admin | Updated: April 26, 2015 23:57 IST2015-04-26T23:57:26+5:302015-04-26T23:57:26+5:30
सनईचे मंगल सूर... गीतांची मैफल... आनंद आणि प्रसन्न वातावरणात रविवारी अनाथ बसंती आणि अपंग बसंत यांचा विवाह सोहळा..

अनाथ बसंती, अपंग बसंतचा अविस्मरणीय विवाह सोहळा
दिग्गजांची हजेरी : महापौरांनी केले कन्यादान
अमरावती : सनईचे मंगल सूर... गीतांची मैफल... आनंद आणि प्रसन्न वातावरणात रविवारी अनाथ बसंती आणि अपंग बसंत यांचा विवाह सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत पार पडला. मुलीचे कन्यादान महापौर चरणजितकौर नंदा, तर मामाची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी निभावली.
बडनेरा मार्गावरील महेश भवन येथे हा सोहळा पार पडला. सायंकाळी ७ वाजता मंगलाष्टकांच्या स्वरात बसंती व बसंतचा विवाह लावण्यात आला. तत्पूर्वी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मारवाडी समाजाच्या पद्धतीने या दोन्ही जोडप्यांचा विधीवत विवाह पार पडला. या सोहळ्याला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, आ. रवी राणा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, कुलगुरु मोहन खेडकर, अनंत गुढे, सुलभा खोडके, संजय खोडके, नानक आहुजा, सुरेश सावदेकर, रवींद्र खांडेकर, माधुरी चेंडके, मंजूषा जाधव, नीलिमा काळे, प्रवीण ठाकरे, तहसीलदार शामकांत मस्के, धनंजय धवड, दीपसिंग बग्गा, पी. जी. गडेकर, गोविंद कासट, बिट्टू सलुजा, चुन्नीलाल मंत्री, आर.बी. अटल, ज्योती अग्रवाल, अधिनंदन पेंढारी, राजाभाऊ मोरे, सोमेश्वर पुसतकर, राजेश महात्मे, मिलिंद बांबल, रश्मी नावंदर, वसंत हरणे, पूजा उमेकर आदींची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यातील वधू बसंती ही नाशीक येथे कुंभमेळ्यात सापडली होती. त्यानंतर तिचे संगोपन वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहात झाले. बडनेरा येथील परमानंद अग्रवाल यांनी जोडप्यांच्या नावे ५० हजार हजारांचा धनादेश सुपूर्द केला. जेवण व हॉलची व्यवस्था बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाचे सोमेश्वर पुसतकर व विशाल अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
शंकरबाबा पापळकरांची अशीही तळमळ
अनाथ बसंतीच्या विवाह सोहळ्याला येणाऱ्या वऱ्हाडी, निमंत्रितांचे मोठ्या सन्मानाने हात जोडून शंकरबाबा पापळकर स्वागत करताना दिसून आले. पायात टायरी चप्पल, विस्कटलेले केसं, डोक्यावर टोपी, अतिशय साधे राहणीमान असलेल्या शंकरबाबांनी सोळाव्या मानसकन्येच्या विवाह सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक निमंत्रिताचे भावपूर्ण स्वागत केले. त्यांची तळमळ ही सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारी दिसत होती.