अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग?

By गणेश वासनिक | Published: February 23, 2024 04:33 PM2024-02-23T16:33:45+5:302024-02-23T16:34:20+5:30

तज्ञ्ज, अभ्यासू चेहऱ्याला देणार प्राधान्य; कुलगुरूंकडूनही काही नावांवर मंथन सुरू.

an experiment of social engineering in the selection of vice-chancellor in amravati university | अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग?

अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग?

गणेश वासनिक, अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या नव्या प्र-कुलगुरू पदांसाठी साेशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबविला जाणार आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या सोबतीला तज्ज्ञ, अभ्यासू चेहऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार ‘परिवारा’तून वेगवान हालचाली सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.

गत आठवड्यात प्र-कुलगुरू पदासाठी अनेक इच्छुकांनी मुंबईवारी केली आहे. काहींनी तर मंत्रालयात उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांचीदेखील सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. काहीही झाले तरी प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्यासाठी ‘परिवारा’तून जुने स्नेह, ऋणानुबंधाला इच्छुकांनी उजळणी दिल्याचे समजते. मात्र, अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदासाठी कुलगुरू डॉ. बारहाते यांच्या सोबतीला ‘लॉबी’मधील चेहरा न देता या वेळी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबविला जाणार आहे. अमरावती विद्यापीठाचे नवे प्र-कुलगुरू हे मंत्रालयातून नव्हे तर नागपुरातून ठरविले जातील. यापूर्वी ज्यांनी अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून कामकाज हाताळले. त्यांना पुन्हा संधी मिळते अथवा नाही, याबाबत ‘परिवारा’तून नव्या रणनीतीवर बरेच काही अवलंबून असल्याची माहिती आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष :

नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्र-कुलगुरू पदासाठी नावे निश्चित करण्याचा विशेषाधिकार कुलगुरूंना आहे. त्यामुळे प्र-कुलगुरूपदी कोणाची निवड करावी आणि तेच नाव व्यवस्थापन परिषदेपुढे द्यावे, या बाबी कुलगुरू डॉ. बारहाते यांना कराव्या लागणार आहे. पण कुलगुरूंनी पाठविलेले नाव व्यवस्थापन परिषदेला मान्य असेल तरच ऑलवेल अन्यथा राज्यपाल भवनातून नव्या प्र-कुलगुरू पदाला मान्यता मिळवावी लागेल, अशी माहिती आहे.

नुटा संघटनेला संधी मिळेल का?

कुलगुरू मिलिंद बारहाते यांना अमरावती विद्यापीठाचा पुढील कार्यकाळ सुरळीत काढण्यासाठी नुटा संघटना, प्राचार्य फोरमचे सहकार्य फार आवश्यक आहे. तर दुसरीकडे सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेत नुटा संघटना, प्राचार्य फोरमचे वर्चस्व आहे. परिणामी प्र-कुलगुरू पदासाठी ज्या व्यक्तीची निवड करायची आहे, त्या व्यक्तीच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे. अन्यथा कुलगुरूंना येत्या काळात नुटा, प्राचार्य फोरमच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्र-कुलगुरू पदासाठी नावे निश्चित करताना कुलगुरू डॉ. बारहाते यांची नक्कीच कसरत होणार आहे.

Web Title: an experiment of social engineering in the selection of vice-chancellor in amravati university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.