महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:24 IST2024-12-16T11:20:58+5:302024-12-16T11:24:20+5:30
Amravati : रवी राणा यांना जबर धक्का; प्रताप अडसड, सुलभा खोडके हेदेखील नाराज

Amravati was completely left out of the state cabinet expansion of the Mahayuti government.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर येथील विधिमंडळाच्या भव्यदिव्य प्रागंणात रविवारी महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मोठ्या थाटात पार पडला. मात्र, अमरावती जिल्ह्यातून आठ पैकी सात महायुतीचे आमदार असतानादेखील राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणालाही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातही अमरावती हे विभागीय केंद्र असल्यामुळे येथे मंत्रिपद मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. परंतु अमरावतीला मंत्रिपदापासून डावलल्याने स्पर्धक आमदारांना 'जोर का झटका धिरे से' मानला जात आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भाजपचे १९, शिंदेसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ९ अशा एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ दिली. किंबहुना गत आठवड्याभरापासून अमरावतीचे नवे मंत्री, पालकमंत्री कोण असेल, याविषयी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती. विशेषतः भाजपचे मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे आमदार रवी राणा यांचे 'भावी कॅबीनेट मंत्री', 'आमचे पालक, आमचे मंत्री' अशा आशयाचे अमरावती, बडनेरा शहरात लागलेले होर्डिंग्ज, फलक हे बरेच काही सांगणारे होते. त्यातही आमदार रवी राणा हे कॅबिनेट मंत्रिपद मिळणार याबाबत कमालीचे आश्वस्त होते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सुमधूर संबंध संपूर्ण राज्याला माहिती आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांकडून आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाबाबत तसे सांगण्यात सुद्धा आले होते, अशी माहिती सूत्रांची आहे. भाजप मंत्रिपदाच्या पहिल्या दहा जणांमध्ये आमदार रवी राणांचे नाव होते. मात्र माशी कुठे शिंकली? हे कुणालाच कळले नाही. रविवारी विस्ताराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार रवी राणांचे नाव गाळले गेले, अशी माहिती आहे. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भाजपचे धामणगावचे आमदार प्रताप अडसड, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यादेखील नाराज झाल्याचे दिसून आले.
रवी राणांचा पॉलिटिकल गेम, मास्टरमाईंड कोण?
अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपचे पाच आमदार निवडून येण्याचा ईतिहास रचला गेला आहे. यात भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आठ पैकी सात महायुतीचे आमदार निवडून आल्याने अमरावतीला मंत्रिपद पक्के अशी राजकीय दिशा ठरली होती. तिवसा, अचलपूर, मेळघाट या भाजपच्या तीन जागांवर राणांचाच शिक्का चालला. म्हणूनच आमदार रवी राणा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे जवळपास ठरले होते. भाजपच्या दिल्लीकरांना तसा मेसेज देण्यात आला होता. पण, रवी राणांचा अचानक पॉलिटिकल गेम झाला. दोन दिवसातच राणांचे मंत्रिपदाच्या यादीतून नाव गायब झाले. पण, ते कापण्यामागे 'तो' मास्टरमाईंड कोण? हा प्रश्न कायम आहे.
'पुनर्वसन फॅक्टर' मंत्रिपदासाठी ठरला अडसर
गत आठवड्यात खासदार डॉ. अनिल बोंडे हे राज्यात परत येतील. ते राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतील. बोंडे हे राज्यसभा सदस्याचा राजीनामा देतील. डॉ. बोंडे यांच्या जागी नवनीत राणा या राज्यसभेवर खासदार म्हणनू पाठवल्या जातील, अशा काहीशा बातम्या चर्चेत होत्या. डॉ. बोंडे, नवनीत राणा यांचे 'पुनर्वसन फॅक्टर' हे सुद्धा आमदार रवी राणा यांच्या मंत्रिपदासाठी अडसर ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाला आहे.
प्रताप अडसडांना राज्यमंत्री पदाचा मिळाला शब्द
धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांना येत्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपदासह पालकमंत्री पदाची धुरा सोपविली जाईल, असा शब्द त्यांना वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे.
गृहमंत्री अमित शाह यांना कोण भेटले?
भाजप आणि संघ परिवारातून आमदार रवी राणा यांना मंत्रिपदासाठी विरोध होता. काही दिवसांपासून रवी राणांची मंत्रिपदासाठीची वाटचाल बघता गत तीन दिवसांपूर्वी अमरावती येथील भाजप व संघ परिवारातील शिष्ठमंडळाने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राणांना मंत्री केल्यास भाजपचे जुने जाणते पदाधिकारी नाराज होतील. राजकारण वेगळ्या दिशेने जाईल, अशा अनेक बाबी या शिष्टमंडळाने ना. शाह यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या यादीतून राणांचे नाव दिल्लीतून गाळले. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.