धुळीने वेढले अमरावती
By Admin | Updated: October 29, 2016 03:12 IST2016-10-29T00:13:15+5:302016-10-29T03:12:16+5:30
धुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धुळीने वेढले अमरावती
जबाबदारी कुणाची ? : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वैभव बाबरेकर अमरावती
धुळीने अख्खे शहर वेढले असताना धुळीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळीच्या प्रकोपाने अमरावतीकरांमध्ये श्वसनाचे आजार जडत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अमरावती शहर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मोठमोठ्या इमारती व उड्डाणपुलांची कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. मात्र, हे होत असताना एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळच खेळत आहे. इमारती किंवा उड्डाणपुलांचे बांधकाम करताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांवलीचे पालन केले जात आहे किंवा नाही, याकडे कोणातीही यंत्रणा लक्ष पुरवीत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुतांश मार्गावर विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच सततची वाहतूक धूळकण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. शहरातील प्रमुख मार्गावर एसटी किंवा अन्य जड वाहनांची वाहतूक धूळ उडवीत आहेत. वाहनधारक, पादचाऱ्यांना जाताना अक्षरशा धूळ खातच पुढे जावे लागत आहे. या धुळीमुळे जीव गुदरमल्यासारखा होत आहे. तरीसुद्धा अमरावतीकर निमुटपणे हे सर्व सहन करीत आहेत. लहान बाळ व वयोवृद्धांवर या धूळकणांचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. मात्र, ते सांगणार तरी कोणाला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या धुळीचे वाईट परिणाम जाणवत असतानाही त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभाग घेत नाही. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत धूळकणाविषयी सतर्कता बाळगून तत्काळ उपाययोजना केल्या जातात, तर मग अमरावती शहरात धूळकणांबाबत दखल का घेतली जात नाही, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये व दवाखान्यांत रोज अनेक रुग्ण श्वसन आजाराच्या उपचाराकरिता जातात. मात्र, या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. असे किती दिवस चालणार, यावर कधी उपाययोजना अंमलात येईल, असे नाना प्रकारचे प्रश्न अमरावतीकरांना पडले आहेत.
धुळीचे कण वाढल्याविषयी काही माहिती नाही. ती जबाबदारी आमची नाही, प्रदूषण हा विषय माझा नाही. धूळकण वाढली हे पहिल्यांदाच कळत आहे.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका
रस्ते, इमारती बांधकाम, वाहनांच्या प्रदूषणामुळे शहरात धूळकणांचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणासंदर्भात नवीन कायदा अमलात आणला गेला आहे. त्यामध्ये प्रत्येकांची जबाबदारी संबंधित शासकीय विभागांना वाटून देण्यात आली आहे. त्यामधील गाईडलाईनची माहिती होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थासह संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे. त्या नियमावलीनुसार संबंधित विभागाने कार्य केल्यास धूळकणासह प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
- राहुल वानखडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
धूळकणाचा थेट प्रभाव फुफ्फुसावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार जडतात. दमा (अस्थमा), त्वचा रोग, डोळ्यांचे आजार बळावण्याची शक्यता असते. धूळकणांचा आरोग्यावर परिणाम झाल्यास डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्यावा.
- स्वप्निल सोनोने,
फिजीशियन