कर्जबाजारी अडत्याची मुंबई एक्स्प्रे सपुढे उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:52 IST2018-03-28T18:52:56+5:302018-03-28T18:52:56+5:30
कर्जाच्या डोंगरामुळे एका अडत्याने अमरातीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर मुंबई एक्स्प्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दीपक गणेश बिजोरे (५२, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे.

कर्जबाजारी अडत्याची मुंबई एक्स्प्रे सपुढे उडी घेऊन आत्महत्या
अमरावती - कर्जाच्या डोंगरामुळे एका अडत्याने अमरातीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर मुंबई एक्स्प्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दीपक गणेश बिजोरे (५२, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे. कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याचे जीआरपी पोलिसांना आढळून आले आहे.
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सायंकाळी ७ वाजता मॉडेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक १ वरून सुटले. तत्पूर्वी, रेल्वेच्या डब्याचे इंजीन लावण्यात येते. मंगळवारी सायंकाळी गाडी निघण्यापूर्वी इंजीन चिचफैलपर्यंत जात असताना दीपक बिजोरेने रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घटनेच्या माहितीवरून जीआरपी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत पडलेल्या दीपक बिजोरे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांना मृताच्या खिश्यात मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. 'माझ्यावर कर्ज असून, परतफेड करणे कठीण आहे. त्यामुळे मी जीवन संपवत आहे’, असे त्यामध्ये नमूद आहे. सोबतच त्याने पत्नी व मुलाची क्षमा मागितल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. इर्विन रुग्णालयात बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
दीपक बिजोरेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत कर्जामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
- राजेश नागरे, पोलीस उपनिरीक्षक, जीआरपी.