Amravati: "आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला", प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
By उज्वल भालेकर | Updated: January 6, 2024 18:23 IST2024-01-06T18:21:28+5:302024-01-06T18:23:55+5:30
Prakash Ambedkar: आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली.

Amravati: "आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला", प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
- उज्वल भालेकर
अमरावती - आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेशी झाली आहे. आमचा २४-२४ सीटचा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यामुळे आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० जानेवारी रोजी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे शनिवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेपासून रोखण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविणे गरजेचे आहे; परंतु काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे, त्यामुळे त्यासंदर्भात जास्त काही बोलणार नाही. आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेली आहे. त्यामुळे आमचे जे काही बोलणे आहे ते फक्त शिवसेनेशी आहे.
आम्ही इंडिया आघाडीत जायला तयार आहोत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तो प्रस्ताव अजूनही स्वीकारलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. ते म्हणाले निवडणूक आयोगाची संविधानिक जबाबदारी ही निवडणुका घेणे ही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे. जर निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा लोकांनी निवडणूक आयोगाला बदडून काढावे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.