देवेंद्र फडणवीसांसमोर रवी राणांची 'मन की बात'; "तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:34 IST2022-08-21T18:33:16+5:302022-08-21T18:34:06+5:30
बडनेरचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांसमोर रवी राणांची 'मन की बात'; "तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणताना..."
बडनेरचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, अभिनेता गोविंदा यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार रवी राणा यांनी आपल्या ‘मन की बात’ सर्वांसमोर सांगितली. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणताना आपल्याला त्रास होत असल्याचं ते म्हणाले.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इथे आले आहेत. त्यांना मी प्रमाण करतचो. आज ते उपमुख्यमंत्री आले, पण ते म्हणताना आम्हाला त्रास होतो. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,” असं रवी राणा म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आमची मैत्रीही भक्कम आहे. ते मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. कायमच त्यांनी मला छुपी साथ दिली आहे. मी अपक्ष म्हणून जरी असलो तरी त्यांच्या संपूर्ण यंत्रणा, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतात. लोकसभेत नवनीत राणा यांनाही पाठिंबा होता. मी भाजपत नसलो तरी मनानं त्यांच्या सोबत आहे, नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत राहून अमरावती महानगरपालिकेत भाजपचा महापौर बनवणार आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्षही भाजपचा बनवणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं.