अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास
By प्रदीप भाकरे | Updated: October 20, 2022 18:24 IST2022-10-20T18:19:28+5:302022-10-20T18:24:26+5:30
शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील घटना; नायालयाने ठोठावली शिक्षा

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास
अमरावती : एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) एस. एन. यादव यांच्या न्यायालयाने आज, गुरुवारी १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ५ सप्टेंबर २०१६ रोजी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
विष्णू बाळकृष्ण मोहोकार (३५) रा. करजगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी ५ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी पीडित मुलगा हा शिकवणीसाठी विष्णू मोहोकार याच्याकडे गेले होता. यावेळी विष्णूने शिकवणीमधील सर्व मुलांना घरी पाठवून दिले. तर पीडित मुलास थांबायला सांगितले. त्यानंतर त्याने पीडित मुलाला आतील खोलीत नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेनंतर पीडित मुलाने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. वडिलांनी शिरजगाव कसबा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी विष्णूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात न्या. एस. एन. यादव यांच्या न्यायालयात ६ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. एस. एन. यादव यांच्या न्यायालयाने आरोपी विष्णू मोहोकार याला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील डी. ए. नवले यांनी यशस्वी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून प्रमोद शिंपी यांनी काम पाहिले.