Amravati lodged a complaint against a regional taxi driver in Mumbai | मुंबईतील परप्रांतीय टॅक्सी चालकाविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल 
मुंबईतील परप्रांतीय टॅक्सी चालकाविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल 

अमरावती : लग्न जुळलेल्या तरुणीच्या फोटोशी छेडछाड करून आणि विवाहाचे बनावट दस्तावेज तयार करून वरपक्षाला पाठविणाºया मुंबईच्या परप्रांतीय टॅक्सीचालकाविरुद्ध अमरावती येथील तरुणीने  फ्रेजरपुरा पोलिसांत सोमवारी तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी विजय ऊर्फ ब्रिजलाल यादव (रा. कल्याण वेस्ट, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी २६ वर्षीय तरुणी मुंबई येथील एका कंपनीत वर्षभरापासून नोकरी करीत आहे. ती कल्याण येथे वास्तव्यास आहे. मे २०१९ मध्ये त्या तरुणीचा विवाह कांदीवली येथील एका तरुणाशी कुटुंबीयांनी जुळविला. मात्र, विजय नामक मुंबईतील टॅक्सीचालक त्या तरुणीच्या मागे लागला. तिने विजयची माहिती काढली असता, तो उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. त्याला ती ओळखत नव्हती; मात्र तो दूरचा नातेवाईक असल्याचे समजले.

तरुणीचा विवाह निश्चित झाल्याचे विजयला समजल्यानंतर त्याने तिच्या वडिलांना फोनवर धमक्या देणे सुरू केले. तुमच्या मुलीशी माझे लग्न झाले आहे; तिचे लग्न दुसरीकडे करू शकत नाही. तिचे लग्न केल्यास मी तुम्हाला जीवे मारून टाकीन, अशा धमक्या विजय तरुणीच्या वडिलांना फोनवर देऊ लागला. याशिवाय तरुणीचा पाठलाग करून मी तुला कुणाची होऊ देणार नाही, तुझे लग्न होऊ देणार नाही, अशा धमक्या देऊन तिला शरीरसुखाची मागणी करू लागला. २७ आॅक्टोबर रोजी तरुणी कांदीवली येथून घरी पायी जात असताना, विजय तेथे आला आणि शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला थापडांनी मारहाण केली, तिने आरडाओरड केल्यानंतर विजय तेथून पळून गेला.

या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मुंबईच्या कल्याण (पश्चिम) स्थित महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे पीडित मुलीने फ्रेजरपुरा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सततच्या पाठलागाने त्रस्त झालेली तरुणी अखेर १६ नोव्हेंबर रोजी अमरावतीला येण्यासाठी निघाली. यादरम्यान विजयने पुन्हा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तरुणीला व तिच्या वडिलांना कॉल केले. विजयच्या अशा त्रासामुळे अबु्रला व जीवितास धोका असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार पीडित मुलीने सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली आहे. 

गैरअर्जदार विजय वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल करतो. त्याने फोटो मिक्सिंंग करून मुंबईतील वकिलामार्फत विवाहाची बनावट नोटरी केली आणि हे दस्तावेज नियोजित पती व माझ्या घरी पाठविल्याचे पीडित मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र ढोके करीत आहेत. 

- मुलीची तक्रार प्राप्त झाली असून, तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईच्या संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

Web Title: Amravati lodged a complaint against a regional taxi driver in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.