बहुरूपी समाजातील पहिली कृषी अधिकारी अमरावतीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:49+5:30
आपल्यासारखेच तिने शिकावे आणि आपल्याच समकक्ष पदावर विराजमान व्हावे, ही त्यांची मनीषा पूनम औंधकर यांनी पूर्ण केली. त्या बहुरूपी समाजातील पहिल्या बीएस्सी (कृषी) पदवीधर आणि कृषी अधिकारी ठरल्या आहेत. त्यांचा अचलपूर पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) या पदावर नियुक्ती आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

बहुरूपी समाजातील पहिली कृषी अधिकारी अमरावतीतून
धीरेंद्र चाकोलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुरूपी जमातीला जेथे जगण्याचीच भ्रांत, तेथे शिक्षणाचे काय? पण, या समाजातील एका व्यक्तीने शिकून शासकीय सेवेची वाट धरली. आपल्या होतकरू मुलीलाही त्याने भरारीसाठी मोकळे आकाश दिले. पित्याने दिलेल्या या संधीचे सोने करीत बहुरूपी समाजातील पहिली बीएस्सी उत्तीर्ण आणि पहिली कृषी अधिकारी होण्याचा बहुमान अमरावतीत वास्तव्यास असणाऱ्या मुलीने पटकावला.
मोर्शी पंचायत समितीत कृषी अधिकारी असलेले सुरेश औंधकर हे बहुरूपी समाजाचे. त्यांना पत्नीचे पाठबळ लाभल्याने ते बी.एस्सी. (कृषी) झाले. त्यांनी आपल्या मुलीला शिक्षणाची वाट दाखविली. आपल्यासारखेच तिने शिकावे आणि आपल्याच समकक्ष पदावर विराजमान व्हावे, ही त्यांची मनीषा पूनम औंधकर यांनी पूर्ण केली. त्या बहुरूपी समाजातील पहिल्या बीएस्सी (कृषी) पदवीधर आणि कृषी अधिकारी ठरल्या आहेत. त्यांचा अचलपूर पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) या पदावर नियुक्ती आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे. विशेष म्हणजे, भटक्या जमातीच्या असताना पूनम औंधकर यांनी आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या गटातून पद मिळविले आहे.
संघर्षाच्या पायावर यशाची इमारत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (लातूर) येथून १९९५ साली सुरेश औंधकर बीएस्सी (कृषी) झाले. त्यावेळी त्यांचे लग्न झालेले होते. पदवी शिक्षणाच्या कालावधीत त्यांनी लातूरला कुटुंबासह पाल टाकून वास्तव्य केले. या संघर्षाच्या पायावरच पूनमच्या यशाची इमारत उभी ठाकली आहे.
हुंड्याऐवजी शिक्षणावर खर्च
बहुरूपी समाजाच्या रीतीभातीनुसार दहावीत असलेल्या पूनमला लग्नासाठी मागणी येऊ लागली होती. तथापि, वडिलांप्रमाणे कृषी अधिकारी होण्याचा ध्यास घेतलेल्या पूनमला पुढे शिकायचे होते. त्यामुळे सुरेश औंधकर यांनी हुंड्याऐवजी तिच्या शिक्षणावर खर्च केला. पूनमनेही संधीचे चीज केले.
माझ्या समाजातून पहिली महिला कृषी अधिकारी असल्याचा आनंद आहे. मुलींना स्वातंत्र्य दिल्यास, सबळ केल्यास प्रत्येक क्षेत्रात ती नावलौकिक करू शकते. माझ्या वडिलांप्रमाणे समाजातील प्रत्येकाने हे अवश्य करावे.
- पूनम औंधकर, कृषी अधिकारी, अचलपूर