तंटामुक्तीत अमरावती जिल्हा अव्वल
By Admin | Updated: April 28, 2015 00:08 IST2015-04-28T00:08:48+5:302015-04-28T00:08:48+5:30
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले.

तंटामुक्तीत अमरावती जिल्हा अव्वल
विभागात ८४ हजार तंटे निकाली : बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबित
सुरेश सवळे अमरावती
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. यात नेहमीप्रमाणे अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे अद्यापही प्रलंबित आहेत.
राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सन २००७ मध्ये तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात सामाजिक एकोप्याचे वातावरण रहावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. गावातील दिवाणी, फौजदारी व महसुली स्वरुपाचे सर्व तंटे सामोपचाराने मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त गाव समित्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या अनुषंगाने गावात धार्मिक, जातीय सलोखा, सामाजिक एकात्मता तसेच गावहिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सात वर्षांत अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे मिटविण्यात आले. या सात वर्षांत दाखल झालेल्या तंट्यांची संख्या ७ लाख ६८ हजार ११७ होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने तंटे मिटविले गेले. दाखल झालेल्या १ लाख ६० हजार ३०४ तंट्यांपैकी ४९ हजार ८४२ तंटे निकाली निघाले आहेत. मोहिमेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्याने दाखल ८४,३८२ तंट्यापैकी ३३,२९६ तंटे सामोेपचाराने मिटविले. तंटामुक्त गाव मोहिमेत तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ४४९ हजार १९० दाखल तंट्यापैकी १८ हजार ८२६ तंटे निकाली काढले आहेत. मोहिमेत विभागात वाशीम जिल्ह्याचा चवथा क्रमांक लागतो. या जिल्ह्याने ८६ हजार ९०६ दाखल तंट्यापैकी १६ हजार २४० तंटे मिटविले आहेत. मोहिमेत बुलडाणा जिल्ह्याची पिछेहाट झाली असून दाखल सर्वाधिक २ लाख ८७ हजार ३३८ तंट्यापैकी केवळ ८ हजार ९६ तंटेच आपसात निकाली काढण्यात यश आले आहे.
बुलडाण्यात अडीच लाख तंटे प्रलंबित
समोपचाराने तंटे मिटविण्यात बुलडाणा जिल्हा पिछाडीवर असला तरी विभागात सर्वाधिक तंटे याच जिल्ह्यात दाखल आहेत. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सात वर्षांच्या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात सामोपचाराने तंटे मिटविण्याबाबत निरुत्साह दिसून आला. त्यामुळे सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाखांवर तंटे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्याकडे गृह विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक गावे तंटामुक्त झाल्याचे खरे श्रेय जिल्ह्यातीलच नागरिकांना आहे. येणाऱ्या काळात अमरावती जिल्हाच तंटामुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
- एस. वीरेश प्रभू,
जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती.