Amravati Crime: आधी गोळीबार, नंतर काढली तलवार; बापासोबत असलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:56 IST2025-08-30T17:54:54+5:302025-08-30T17:56:40+5:30
Amravati : प्रशांतनगर स्थित एका हेअर सलूनसमोर हवेत गोळीबार व तलवार उगारल्याप्रकरणी दोन सराईतांना अटक करण्यात आली, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.

Amravati Crime: First shot, then sword drawn; Fatal attack on young man with father
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रशांतनगर स्थित एका हेअर सलूनसमोर हवेत गोळीबार व तलवार उगारल्याप्रकरणी दोन सराईतांना अटक करण्यात आली, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ती घटना घडली होती. सय्यद अबुजर ऊर्फ मस्तान वल्द सय्यद सलिम (१९, रा. हबीब नगर नं. २) व मोहम्मद रेहान मोहम्मद असलम (२०, रा. सुफियान नगर नं. २) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने २९ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून रिकामे काडतूस व आरोपींकडून देशी कट्टा जप्त केला. आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने वा हवेत एक फायर केल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
दोन्ही आरोपीविरुद्ध नागपुरी गेट, राजापेठ व गाडगेनगर ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव व शस्त्र अधिनियमान्वये तीन गुन्हे दाखल आहेत. विधिसंघर्षित बालकासह तिघेही धरमकाटा परिसरात दडून बसले होते. एपीआय मनीष वाकोडे यांनी त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी अयान शेख (रा. फ्रेजरपुरा) याच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.
काय घडले नेमके ?
अयान हा त्याच्या वडिलांसह स्वतःच्या सलूनसमोर उभा असताना सै. अबुजर, मोहम्मद रेहान व एक विधिसंघर्षित बालक हे एका बाइकवर तेथे आले. अयान व त्याच्या वडिलास शिवीगाळ केली. जिवाने मारण्याची धमकी दिली. अयानच्या वडिलांनी आरोपींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, अबुजर याने कंबरेतून देशी कट्टा काढून दोघांच्या दिशेने गोळीबार केला, तर रेहानने बाईकला लावलेली तलवार काढून हल्ला केला. मात्र, ते सैरावैरा पळत सुटल्याने त्यांचा जीव वाचला. आरोपींनी आपल्यासह वडिलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार अयान याने नोंदविली. २७ ऑगस्ट रोजी रात्रीदेखील आरोपींनी अयानच्या दुकानात शिरून त्याच्या मोठ्या वडिलांना मारहाण केली होती.