Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 23:10 IST2026-04-05T23:09:26+5:302026-04-05T23:10:57+5:30
SGBAU: संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून ते पन्नास दिवस ही कादंबरी हटवण्यात आली आहे. 'बीए मराठी'च्या द्वितीय वर्षाला अभ्यासासाठी असलेल्या या कादंबरीबद्दल तक्रार करण्यात आली होती. विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ असे मतदान झाले.

Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
-गणेश वासनिक, अमरावती
अमरावती : लेखक पवन भगत लिखित 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली आहे. यासंदर्भात गुरुवार २ एप्रिल रोजी पार पडलेल्या विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ अशांनी मतांनी ही कादंबरी हटविण्याचा निर्णय सभागृहात झाला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या पीठासीनाखाली ‘मॅनेजमेंट’पार पडली.
अमरावती विद्यापीठाकडे डॉ. संगीता जगताप यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी 'भाजप सरकारविरोधी' असल्याचा आक्षेप घेतल्याने ती हटवण्याची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने हा विषय अभ्यास मंडळाने पुन्हा निर्णयार्थ पाठविला होता. तेव्हा ही कादंबरी 'बीए मराठी'च्या द्वितीय वर्षाला अभ्यासासाठी कायम ठेवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ स्टडीने घेतला होता; परंतु ही तक्रार विद्वत परिषदेपुढे गेली.
या कादंबरीवर विद्वत परिषदेत चर्चा झाली. येथे ही कादंबरी हटविण्याचा निर्णय झाला. परिषदेत कादंबरीसंदर्भात चर्चा झाली असता सदस्यांमध्ये मतेमतांतरे आणि मनभेद दिसून आले. तेव्हा कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सदस्यांचे हात उंचावून मतदान घेतले असता 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवावी, यासाठी २३ जण विरोधात, तर ८ सदस्य बाजूने असल्याचे चित्र होते. अखेर कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या कार्यवाहीचा निर्णय ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.
नेमकं काय घडलं?
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्धारित करणाऱ्या मराठी अभ्यासमंडळाने 'बीए मराठी'च्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रासाठी 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी समाविष्ट केली होती. मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी सहा महिन्यांपूर्वी ही कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया झाली.
मराठी अभ्यासमंडळाने एकमताने या कादंबरीचा समावेश केला होता. विद्याशाखेत मान्य झाल्यानंतर अकॅडमिक कौन्सिलमध्येही या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली होती. ती शिकवण्याचं कामही सुरू झाले होते, असे त्यांनी सांगितले.
लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य
'ते पन्नास दिवस' ही कादंबरी ललित साहित्य कृती आहे. कोरोना काळातील लिखाण असून पक्ष अथवा सरकारवर ताशेरे ओढण्याचा प्रश्नच येत नाही. लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य असून दोषांकडे व्यापक दृष्टिकोनातून स्वीकारार्थ असावे. लोकशाही मूल्यांचे जतन व्हावे, ही काळाची गरज आहे, असे साहित्याच्या समीक्षक डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या.
कादंबरी अभ्यासक्रमातून हटवणे ही एकप्रकारे अघोषित आणीबाणी आहे. लेखनस्वातंत्र्यावर गदा येते आणि सेन्सॉरशिप करणे उचित नाही. ही कादंबरी अभ्यासक्रमाला लावा, असा कसलाही अर्ज मी विद्यापीठांना कधीही केलेला नाही. विद्यापीठानेच हे पुस्तक स्वीकारलं होते, असे कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले.
कुलगुरु म्हणाले...
विद्वत परिषदेत कादंबरीबाबत एकमत होत नव्हते. त्यामुळे मतदान झाले आणि बहुमताने 'ते पन्नास दिवस' कादंबरी हटविण्याचा निर्णय झाला. सभागृहाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे. -डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.