मुलांच्या सर्व लसी फुकटात, मग पैसे कशाला मोजायचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:19 IST2025-01-24T12:16:47+5:302025-01-24T12:19:22+5:30
Amravati : बाळाचे आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे

All vaccines for children are free, so why pay for them?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपल्या बाळाचे जन्मानंतर जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत लसीकरणाचे वेळापत्रक डॉक्टर आखून देतात. या सर्व लसी या जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्वच शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात. त्यामुळे या लसीकरणासाठी नागरिकांना खासगी रुग्णालयात पैसे मोजण्याची गरज नाही.
घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर तत्काळ त्याचे लसीकरण केले जाते. कारण भविष्यात होणाऱ्या आजारांपासून, त्याचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नागरिकांमध्ये या लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. लसीकरणामध्ये बाळाला पोलिओ, गोवर क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, कावीळ, इन्फ्लुएन्झा बी आणि धनुर्वात या आजारांचा प्रतिबंधात्मक लस दिल्या जातात. विशेष म्हणजे, सर्व सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात हे लसीकरण मोफत केले जाते. या लसीकरणामुळे बाळाच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. प्रत्येक बाळाच्या आईवडिलांना पाच वर्षात कोणती लस कोणत्या वयात दिली गेली पाहिजे, याचे वेळापत्रक व माहिती असलेले कार्ड देण्यात येते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच येवून आपल्या बाळांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोणती लस कधी घ्यायची?
बीसीजी: बाळाला बीसीजी लस जन्म झाल्यावर लगेच किंवा एक वर्ष पूर्ण होईपर्यंत द्यावी. ही लस क्षयरोग (टीबी) होऊ नये म्हणून दिली जाते.
हिपॅटायटीस : बाळाला हिपॅटायटीस बी लस जन्माच्या वेळी दिली जाते. हिपॅटायटीस बी हा यकृताला संक्रमित करणारा विषाणू आहे. या लसमुळे बाळाचे आयुष्यभर संरक्षण होते.
ओरल पोलिओ : ओरल पोलिआ बाळ जन्मल्याबरोबर पहिला डोस, दुसरा डोस ६ आठवड्यात, तिसरा डोस दहा आठवड्यात, शेवटचा डोस १४ आठवड्यात दिला जातो.
जिल्हा रुग्णालयात सर्व लस मोफत
बाळांच्या सर्व लसी या जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सर्वच शासकीय रुग्णालयात मोफत दिली जाते.
"बाळ जन्मल्यानंतर त्याचा निरोगी जीवनासाठी तसेच जीवघेण्या आजारातून बचाव करण्यासाठी बाळाचे लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात हे लसीकरण मोफत होते."
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक